36% of IIT Bombay graduates fail to get placement: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई प्लेसमेंटमध्ये सलग दुसऱ्या वर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाही, ही चिंतेची बाब आहे. यंदा प्लेसमेंटसाठी नोंदणी केलेल्या ३५.८ टक्के विद्यार्थ्यांना अद्याप नोकरी मिळालेली नाही. गेल्या वर्षी आयआयटी मुंबईच्या ३२ टक्के विद्यार्थ्यांना स्थान मिळाले नव्हते.संस्थेचे माजी विद्यार्थी आणि ग्लोबल आयआयटी अॅल्युमिनी सपोर्ट ग्रुपचे संस्थापक धीरज सिंग यांनी आयआयटी प्लेसमेंटच्या आकडेवारीत ही बाब उघड केली आहे. देशातील प्रतिष्ठित आयआयटी संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी मुंबईची ही अवस्था खरोखरच विचार करायला भाग पाडणारी आहे.
आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंट सेलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “जागतिक आर्थिक मंदीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपन्यांना कॅम्पसमध्ये आमंत्रित करणे कठीण होते. बहुतांश कंपन्या संस्थेने ठरवून दिलेले वेतन पॅकेज स्वीकारू शकत नव्हत्या. सर्वाधिक मागणी असलेल्या संगणक शास्त्र आणि अभियांत्रिकी शाखेतील नोंदणीकृत विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच १०० टक्के नोकरी मिळालेली नाही.”
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दरवर्षी डिसेंबर आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत प्लेसमेंट आयोजित करते. यामुळे आयआयटी मुंबईमध्ये शिकणारे विद्यार्थी दरवर्षी डिसेंबर आणि फेब्रुवारीनंतरच्या प्लेसमेंटची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण याच महिन्यांवर त्यांचे करिअर अवलंबून असते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या महिन्यांत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच पडली. यावर्षी नोंदणीकृत २००० विद्यार्थ्यांपैकी सुमारे ७१२ विद्यार्थ्यांना अद्याप नोकरी मिळालेली नाही.
गेल्या वर्षी ३२.८ टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकली नव्हती. या वर्षी अद्याप नोकरी न मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २.८ टक्क्यांनी वाढली आहे. २०२३ मध्ये २ हजार २०९ नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी केवळ १ हजार ४८५ विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकली. सध्या प्लेसमेंटचा हंगाम सुरू आहे, जो मेपर्यंत सुरू राहणार आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारच्या रोजगारासंदर्भातील हेतू आणि धोरणावर प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी म्हणाले की, "आता आयआयटीसारख्या सर्वोच्च संस्थाही बेरोजगारीच्या आजाराच्या विळख्यात सापडल्या आहेत. गेल्या वर्षी ३२ टक्के आणि यावर्षी ३६ टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली नाही. देशातील सर्वात प्रतिष्ठित टेक्निकल इन्स्टिट्यूटची ही अवस्था आहे, मग भाजपने संपूर्ण देशासाठी काय स्थिती निर्माण केली आहे याची कल्पना करा."