bangladesh elections : बांगलादेशात पुन्हा एकदा अबकीबार शेख हसीना सरकार सत्तेवर येणार आहेत. रविवारी झालेल्या निवडणुकीत त्यांनी विक्रमी मते मीवळत विजयी झाल्या. मात्र, या निवडणुकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याने मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात घटला. केवळ ४० टक्के मतदानाची नोंद झाली आहे. पाच वर्षांपूर्वी, २०१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ८० टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली होती. विरोधकांनी हसीना यांच्याकडे निवडणुकीपूर्वी राजीनामा देण्याची मागणी केली होती, जी त्यांनी मान्य करण्यास नकार दिला. त्यानंतर विरोधकांनी ४८ तास आंदोलन केले होते. काही ठिकाणी हिंसाचार देखील झाला होता. येथील रेल्वे पेटवल्याने तब्बल नागरिकांचा मृत्यू देखील झाला होता.
मतमोजणी सुरू असतांना हसीनाच्या सत्ताधारी अवामी लीगने ५० टक्क्यांहून अधिक जागा जिंकल्या आहेत," असे निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने एएफपीला सांगितले. बांगलादेशच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान शेख हसीना यांनी पाचव्यांदा पुन्हा निवडणूक जिंकली आहे. दुसरीकडे, निवडणुकीवर बहिष्कार टाकताना प्रमुख विरोधी पक्षाने शेख हसीना यांच्या सरकारवर देश उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला. त्यांनी पंतप्रधान शेख हसीनावर निवडणुकीपूर्वी राजीनामा देण्याची मागणी केली होती, परंतु शेख यांनी ही मागणी फेटाळली. हसीना सरकारने देशात मोठ्या प्रमाणात मानवी हक्कांचे उल्लंघन केले आहे आणि विरोधकांवर निर्दयी कारवाई केली आहे, असा आरोप विरोधकांनी केला होता.
बिडी न्यूज २४ च्या वृत्तानुसार, हसीना यांनी गोपालगंज-३ लोकसभा जागेवर पुन्हा दणदणीत विजय मिळवला आहे. १९८६ नंतरचा या जागेवरील त्यांचा हा आठवा विजय आहे. हसीना यांना २,४९,९५६ मते मिळाली, तर त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी आणि बांगलादेश सुप्रीम पार्टीचे एम निजाम उद्दीन लष्कर यांना केवळ ४६९ मते मिळाली.
शेख हासिना या २००९ पासून बांगलादेशातील सत्तेची धुरा सांभाळत आहेत. यावेळीची त्यांची ही पाचवी टर्म असेल. त्यांचा पक्ष अवामी लीगचे सरचिटणीस ओबेदुल कादिर यांनी दावा केला की लोकांनी मतदानाद्वारे बीएनपी आणि जमात-ए-इस्लामीचा निवडणूक बहिष्कार नाकारला. कादिर म्हणाले, १२ व्या राष्ट्रीय संसदीय निवडणुकीत मतदान करण्यासाठी ज्यांनी तोडफोड, जाळपोळ आणि दहशतवादाच्या भीतीला कंटाळून मतदान केले त्यांचे मी आभार मानतो.
मुख्य निवडणूक आयुक्त काझी हबीबुल अवल यांनी सांगितले की, प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ४० टक्के मतदान झाले होते, परंतु हा आकडा बदलू शकतो. २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण मतदान ८० टक्क्यांहून अधिक होते. निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने सांगितले की, "मतदान दुपारी ४ वाजता संपले. मतमोजणी सुरू झाली. सोमवारी पहाटेपर्यंत संपूर्ण निकाल अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. सात मतदान केंद्रांवर अनियमिततेमुळे मतदान पुढे ढकलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाने सांगितले की, हिंसाचाराच्या काही घटना सोडल्या तर ३०० पैकी २९९ मतदारसंघांमध्ये मतदान मोठ्या प्रमाणात आणि शांततेत पार पडले. उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे एका जागेवर नंतर मतदान घेण्यात येईल. वृत्तानुसार, नरसिंगडीमधील एक आणि नारायणगंजमधील एक अशा दोन मतदान केंद्रांवर मतदान रद्द करण्यात आले. निवडणूक आयोगाने नरसिंगडी येथे निवडणूक दंगलीच्या आरोपावरून उद्योगमंत्री नुरुल माजीद महमूद हुमायून यांच्या मुलाला अटक करण्याचे आदेश दिले आहेत.
चितगाव-१० जागेवरून निवडणूक लढवणाऱ्या दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीत गोळीबार झाला. २४ वर्षीय शांतो बरुआ आणि ३५ वर्षीय जमाल या दोघांना गोळ्या घातल्याने चटगाव मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आले आहे. शरीशाबारी, जमालपूर येथील मतदान केंद्रावर अवामी लीग उमेदवार आणि अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याने दोन जण जखमी झाले. ढाक्यातील हजारीबाग येथील मतदान केंद्राजवळ झालेल्या दोन क्रूड बॉम्बच्या स्फोटात एका लहान मुलासह चार जण जखमी झाले.
संबंधित बातम्या