PM Modi In Kargil : दहशतवाद्यांचा खातमा हीच खरी दिवाळी; कारगिलमध्ये जाऊन मोदींची ‘आतषबाजी’
PM Narendra Modi In Kargil : ‘जेव्हा जेव्हा कारगिलमध्ये युद्ध झालं आहे तेव्हा भारतानं पाकिस्तानला धूळ चारली असल्याचं’ सांगत पीएम नरेंद्र मोदींनी भारतीय सैन्यांच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे.
PM Narendra Modi In Kargil : आज संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात दिवाळी साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असून आता ते दिवाळी साजरी करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे कारगिलमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी भारतीय सैन्यातील जवानांसोबत दिवाळी साजरी केली असून यावेळी बोलताना पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. शांततेशिवाय सामर्थ्यवान होणं शक्य नसून सरकारनं युद्धाला शेवटचा पर्याय मानलेलं आहे. दहशतवाद्यांच्या अंत करत दिवाळी साजरी करणं हाच खरा दिवाळीचा अर्थ असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
ट्रेंडिंग न्यूज
२०१४ साली केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक दिवाळीत भारतीय सैन्यासोबत सण साजरा केलेला आहे. यावेळी त्यांनी सैन्याची कामगिरी आणि त्यांच्या बलिदान देण्याच्या तयारीतून काम करताना प्रेरणा मिळते, असं म्हटलं आहे. याशिवाय कारगिलमध्ये असं एकही युद्ध झालं नाही ज्यात भारतानं पाकिस्तानला धूळ चारलेली नसेल, युद्ध कारगिलमध्ये असेल किंवा श्रीलंकेत अथवा कुरुक्षेत्रात, आम्ही नेहमीच युद्धाला टाळण्याचा प्रयत्न केलाय, कारण जग शांततेच्या बाजूनं असल्याचंही मोदी म्हणाले.
सैनिकांशिवाय माझी दिवाळी अपूर्ण- मोदी
भारतीय सैन्यातील जवान हे माझ्या कुटुंबातील सदस्यांसारखे आहेत. त्यांच्याशिवाय माझी दिवाळी अपूर्ण आहे. यावेळी मोदींनी सैनिकांच्या शौर्याचं कौतुक केलं असून माझ्या दिवाळीचा गोडवा तुमच्यासोबतच असल्याचं म्हटलं आहे.
आतंकवाद्यांना संपवण्यात आम्ही यशस्वी- मोदी
भारतीय सैन्यानं आतंकवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईचं कौतुक करताना पीएम नरेंद्र मोदी म्हणाले की, द्रास, बटालिक आणि टायगर हिल तुकड्यांच्या शूरतेचा मी साक्षी आहे. भारतीय सैन्यानं कारगिलमधील दहशतवादाचा नायनाट केला असून त्याचा मी साक्षीदार असल्याचं म्हणत जवानांच्या कार्याचं कौतुक केलं आहे. याशिवाय आता सैन्यात महिलांनाही स्थान मिळालं असल्यानं आमच्या मुली सैन्यात आल्यानं तिन्ही दलांची ताकद आणखी वाढणार असल्याचंही मोदी म्हणाले.