मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gujarat Election 2022 : पीएम मोदींची थेट रावणाशी तुलना; मल्लिकार्जुन खरगेंच्या वक्तव्यानं वादंग

Gujarat Election 2022 : पीएम मोदींची थेट रावणाशी तुलना; मल्लिकार्जुन खरगेंच्या वक्तव्यानं वादंग

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 29, 2022 02:18 PM IST

Gujarat Assembly Election : गुजरातमधील विधानसभा निवडणुकीचं मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपलं आहे. आज प्रचारसभांचा शेवटचा दिवस असल्यानं भाजप-कॉंग्रेसमधील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत.

mallikarjun kharge vs narendra modi
mallikarjun kharge vs narendra modi (HT)

Gujarat Assembly Election 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे. त्यामुळं कॉंग्रेससह भाजप आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केल्याचं पाहायला मिळालं. परंतु आता कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळं आता ऐन मतदानाच्या तोंडावर कॉंग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे. याशिवाय याच मुद्द्यावरून भाजपनं कॉंग्रेसला घेरण्याची तयारी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गुजरातमधील एका प्रचारसभेत बोलताना कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, मोदींचा चेहरा आता किती वेळा पाहायचा, महापालिका निवडणुकीत, विधानसभेच्या निवडणुकीत आणि लोकसभेच्या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा भाजपकडून पुढे केला जातो. किती चेहरे आहेत यांचे, रावणासारखे शंभर तोंडं तर नाही ना?, असं म्हणत खरगेंनी मोदींबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळं आता या वक्तव्यावरून मतदानाच्या दोन दिवसांआधी कॉंग्रेसची अडचण होण्याची शक्यता आहे.

गुजरातमध्ये भाजपनं कोणताही विकास केलेला नाही, फक्त खोट्या आश्वासनांचा भडीमार गुजराती जनतेवर केला जात आहे. वर्षाकाठी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं होतं. कुठंय तरुणांचा रोजगार?, यापूर्वी कॉंग्रेसच्या सरकारनं केलेल्या कामांनाच ते डागडूजी करून आपण केल्याचं दाखवत असल्याचं सांगत खरगेंनी भाजप आणि मोदींवर सडकून टीका केली आहे.

वादग्रस्त वक्तव्यांनी कॉंग्रेस अडचणीत?

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदींना नीच म्हटलं होतं. त्यामुळं गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मोठी राजकीय किंमत मोजावी लागली होती. याशिवाय आताच्या निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांनी 'मोदींना गुजरातमध्ये औकात दाखवून देण्याची' भाषा केली आहे. याशिवाय आता कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी मोदींची तुलना थेट रावणाशी केल्यानं भाजपकडून या दोन्ही नेत्यांविरोधात जोरदार टीका केली जात आहे.

IPL_Entry_Point