Nitin Gadkari Interview News : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या दहा वर्षातील कामगिरीचं गुणगान करत देशभर फिरत असताना त्यांच्यात मंत्रिमंडळातील एक सहकारी, रस्ते व महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारमधील नेमक्या चुकांवर बोट ठेवल्याने भाजपची चांगलीच पंचाईत झाली आहे. मराठमोळे गडकरी हे स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. गडकरी यांनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर भाष्य केलं आहे. देशातला शेतकरी, मजूर, गरीब आज दु:खी असल्याचं गडकरींनी या मुलाखतीत म्हटलं आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) तोंडावर गडकरींनी व्यक्त केलेल्या स्पष्ट मतांमुळं केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याची कॉंग्रेस पक्षाला आयतीच संधी चालून आली आहे. कॉंग्रेस पक्षाने गडकरींचा हा व्हिडिओ ट्विट करत आता गडकरींना देशद्रोही जाहीर करणार का, असा प्रश्न केला आहे.
पंजाबच्या शेतकऱ्यांचं आंदोलन गाजत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मात्र याबाबत चकार शब्द काढलेला नाही. या आंदोलनाबाबत नितीन गडकरी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गडकरी म्हणाले, ‘तांदूळ, मका, साखर, गव्हाचं अतिरिक्त होणारं उत्पादन हा मुद्दा महत्त्वाचा आहे. हरियाणामध्ये गहू आणि तांदूळ ठेवण्यासाठी रेल्वेचेप्लॅटफॉर्म वापरावे लागतात. आपल्याकडे साठवणुकीची पुरेशी व्यवस्था नाही’ असं नितीन गडकरी म्हणाले.
ग्रामीण भागात शेती क्षेत्रात विकास झाला आहे. परंतु इतर क्षेत्रात जेवढा विकास झाला तेवढा झालेला नाही. आमचं सरकार आल्यानंतर आम्हीही खूप काम केलं. देशात १६ लाख कोटी रुपयाचं जीवाश्म इंधन परदेशातून आयात केलं जातं. यापैकी ५ लाख कोटींचं इथॅनॉल आणि हरित हायड्रोजन भारतातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलं तरी आपल्या देशातला शेतकरी सुखी आणि समृद्ध होऊन गावागावांत रोजगार निर्माण होईल… हाच या परिस्थितीवर उपाय आहे’ असं गडकरी म्हणाले.
देशात व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी व पुरवठा यानुसार शेती उत्पादनांचा भाव ठरत असतो. पण आपल्याकडे देशांतर्गत बाजारपेठेत मात्र धान्याच्या किमतींमध्ये फारसे बदल होत नाहीत. त्यामुळे शेती आर्थिकदृष्ट्या परवडेनाशी झाली आहे. या देशाचा अन्नदाता शेतकरी हा ऊर्जा उत्पादकही व्हावा हे माझ्या आयुष्याचं ध्येय आहे, अशी भूमिका गडकरी यांनी या मुलाखतीत मांडली.
दरम्यान, युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी गडकरी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘नितीन गडकरी स्पष्ट बोलल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असं मला वाटतं. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उभं राहून ते थेट मोदींचा आलेख खाली पाडण्याचा कट रचत आहेत..' असं ट्विट श्रीनिवास यांनी केलं आहे.