मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Meghalaya Results : मेघालयात भाजपचं टेन्शन वाढलं! तृणमूल काँग्रेसची जोरदार मुसंडी

Meghalaya Results : मेघालयात भाजपचं टेन्शन वाढलं! तृणमूल काँग्रेसची जोरदार मुसंडी

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 02, 2023 11:28 AM IST

Meghalaya Assembly Election Results : मेघालयात स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेणाऱ्या भाजपला दणका बसला आहे. भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला असून तृणमूल काँग्रेसनं मुसंडी मारली आहे.

Mamata Banerjee
Mamata Banerjee

Meghalaya Assembly Election Results : मेघालय विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार इथं कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नाही. मेघालयात सत्तेचा दावा करणारा केंद्रातील सत्ताधारी भाजप इथं तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं अनपेक्षितरित्या मुंसडी मारत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्यामुळं इथं सत्तेत सहभागी होण्याचा भाजपचा प्रयत्न फसण्याची चिन्हं आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

आतापर्यंतच्या निकालानुसार संगमा यांच्या एनपीपी पक्षाला सर्वाधिक २४ जागा मिळाल्या आहेत. भाजप ६ जागांवर आघाडीवर आहे. तर, तृणमूल काँग्रेस ७ जागांवर आघाडीवर आहे. हाच कल कायम राहिल्यास विधानसभा त्रिशंकू होणार असून सत्तेसाठी एनपीपीपी भाजपऐवजी तृणमूल काँग्रेसची मदत घेऊ शकते.

निवडणुकीचे निकाल हाती येताच भाजपनं सत्तेत सहभागी होण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्या आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा यांनी तातडीनं मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांची भेट घेतली आहे. मागील वेळेस मेघालयात भाजप आणि एनपीपी आघाडीचे सरकार होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा दोन्ही पक्षांना झाला असला तरी निर्विवाद बहुमत कोणालाही मिळण्याची शक्यता नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमा आणि सरमा यांची गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीत निवडणुकीनंतरच्या युतीच्या शक्यतेवर चर्चा करण्यात आली. तिथून संगमा हे त्यांच्या मूळ गावी तुरा इथं परतल्याचं समजतं.

सरमा हे ईशान्येतील भाजपचे मुख्य रणनीतीकार मानले जातात. भाजपच्या नेतृत्वाखालील नॉर्थ ईस्ट डेव्हलपमेंट अलायन्सचे प्रमुख आहेत. २०१६ मध्ये काँग्रेसचा पराभव करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेससोबत सरकार स्थापन करणार नाही, असं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळं मेघालयच्या मुख्यमंत्र्यांसोबतची त्यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

IPL_Entry_Point