मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mohammad Faizal : राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याची खासदारकी रद्द; काय आहे नेमकं प्रकरण?

Mohammad Faizal : राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याची खासदारकी रद्द; काय आहे नेमकं प्रकरण?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 14, 2023 11:09 AM IST

NCP MP Mohammad Faizal : तीन दिवसांपूर्वीच कोर्टानं राष्ट्रवादीच्या खासदाराला दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता लोकसभा सचिवालयानं त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

NCP MP Mohammad Faizal Disqualified from Lok Sabha
NCP MP Mohammad Faizal Disqualified from Lok Sabha (HT)

NCP MP Mohammad Faizal Disqualified from Lok Sabha : लक्षद्वीपमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आलं आहे. लोकसभा सचिवालयानं शुक्रवारी उशिरा या संदर्भात अधिसूचना जारी केली असून ज्यामध्ये २००९ साली दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात खासदाराला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळं महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादीला मोठा राजकीय धक्का बसला आहे. कावरत्ती येथील जिल्हा सत्र न्यायालयानं ११ जानेवारीला मोहम्मद फैजल आणि अन्य आरोपींच्या जामीनाला स्थगिती दिली होती, त्यानंतर खासदार फैजल यांच्यासह सर्व आरोपींची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

जिल्हा न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेविरोधात खासदार फैजल यांनी केरळच्या उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र हायकोर्टानं या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. काँग्रेस नेते मोहम्मद सलिया यांच्याशी झालेल्या वादानंतर खासदार मोहम्मद फैजल यांनी समर्थकांसह सलिया यांच्यावर हल्ला करत त्यांना मारहाण केली होती. त्यानंतर मोहम्मद फैजल आणि इतरांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात खासदार मोहम्मद फैजल यांच्यासह ३२ जण आरोपी होते आणि त्यातील चार जणांना न्यायालयाने दोषी ठरवले, त्यात राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांचाही समावेश होता.

काय आहे नेमकं प्रकरण?

२००९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान लक्षद्वीपमध्ये संघर्ष झाला होता. मोहम्मद सलीह यांनी १७ एप्रिल २००९ रोजी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत मोहम्मद फैजल आणि त्याचे साथीदार नुरुल अमीन, मोहम्मद हुसेन, बशीर थंगल आणि इतरांनी दरवाजा तोडून त्याच्या घरात प्रवेश केला आणि तलवारी, चाकू आणि लोखंडी रॉडने त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता कोर्टानं मोहम्मद फैजल यांना शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयानं त्यांची खासदारकी रद्द केली आहे.

IPL_Entry_Point