मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Santokh Singh : भारत जोडो यात्रेत काँग्रेसच्या खासदाराचा मृत्यू; राहुल गांधींनी पदयात्रा थांबवली

Santokh Singh : भारत जोडो यात्रेत काँग्रेसच्या खासदाराचा मृत्यू; राहुल गांधींनी पदयात्रा थांबवली

Jan 14, 2023 10:40 AM IST

Bharat Jodo Yatra In Punjab : भारत जोडो यात्रेत चालत असताना काँग्रेसच्या खासदाराचं ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.

Congress MP Chaudhary Santokh Singh Passed Away
Congress MP Chaudhary Santokh Singh Passed Away (HT)

Congress MP Chaudhary Santokh Singh Passed Away : भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेत काँग्रेसचे खासदार चौधरी संतोख सिंह यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं पंजाबसह देशभरात खळबळ उडाली असून अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राहुल गांधीसोबत पदयात्रेत चालत असताना संतोख सिंह यांना ह्रदयविकाचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यामुळं राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काही वेळासाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमधून जम्मू-काश्मिरच्या दिशेनं प्रवास करत आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे खासदार चौधरी संतोख सिंह हे चालत होते. पदयात्रा लुधियानाच्या लाडोवाल टोलनाक्याजवळ येताच संतोख सिंह यांना हार्ट अटॅक आला. त्यावेळी उपस्थित नेत्यांनी त्यांना सावरत उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. संतोख सिंह हे ७६ वर्षांचे होते, त्यांच्या निधनामुळं काँग्रेससह अनेक पक्षाच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

काँग्रेसचे खासदार चौधरी संतोख सिंह यांच्या निधनाचं वृत्त समजताच राहुल गांधी यांनी भटियानमध्ये भारत जोडो यात्रा काही वेळासाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. फिल्लौरच्या भटियानमधील प्रभज्योतसिंग यांच्या घराबाहेर ही यात्रा सद्या थांबविण्यात आली असून राहुल गांधी चौधरी संतोख सिंह यांच्या अंत्यसंस्कारासाठी जाणार असल्याची माहिती आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४