SM Nasar DMK : खुर्ची आणायला उशीर झाल्याने मंत्र्याची तरुणाला मारहाण; घटनेचा व्हिडिओ व्हायरल
SM Nasar DMK : खुर्ची आणायला उशीर झाला म्हणून मंत्र्यानं आपल्याच कार्यकर्त्यावर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे.
SM Nasar DMK Viral Video : एका कार्यक्रमात बसण्यासाठी खुर्ची आणायला उशीर झाल्याच्या कारणावरून मंत्र्यानं थेट पक्षाच्या कार्यकर्त्यावर दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तामिळनाडू सरकारमधील दुग्धव्यवसाय मंत्री एसएम नासर यांनी कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. तिरुवल्लूरमधील एका कार्यक्रमात हा प्रकार घडल्यानंतर आता त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
वृत्तसंस्था एएनआयने शेयर केलेल्या व्हिडिओनुसार, तामिळनाडूचे दुग्धव्यवसाय मंत्री एसएम नासर हे एका मोकळ्या ठिकाणी उभे होते. त्यावेळी त्यांनी एका कार्यकर्त्याला खुर्ची आणायला सांगितली. परंतु त्याला खुर्ची आणायला उशीर झाल्यामुळं मंत्री नासर चांगलेच संतापले. चिडलेल्या नासर यांनी कार्यकर्त्याला अरेरावी करत त्याच्यावर दगडफेक केली. त्यानंतर द्रमूकच्या कार्यकर्त्यानं खुर्ची दिल्यानंतर नासर त्यावर बसले. परंतु आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
परंतु वादात अडकण्याची नासर यांची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळं ते अचडणीत आले होते. केंद्र सरकारनं दूधावर जीएसटी लावल्याचं वक्तव्य केल्यानंतर तामिळनाडूत दूधाचे भाव वाढले होते. त्यानंतर नासर यांनी चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
एसएम नासर हे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे विश्वासू मंत्री मानले जातात. मतदारसंघात सक्रियता आणि कार्यकर्त्यांशी दांडगा जनसंपर्क असल्यामुळं ते गेल्या अनेक वर्षांपासून आवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी एआयडीएमकेचे मातब्बर नेते पंडियाराजन यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव केला होता. त्यानंतर डीएमकेचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली होती.