मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Karnataka Election Results : काँग्रेसचे विजयी आमदार कर्नाटकाबाहेर, भाजपकडून ‘ऑपरेशन लोटस’ सुरू?

Karnataka Election Results : काँग्रेसचे विजयी आमदार कर्नाटकाबाहेर, भाजपकडून ‘ऑपरेशन लोटस’ सुरू?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 13, 2023 03:49 PM IST

Karnataka Election Results 2023 Live Updates : कर्नाटकात काँग्रेसने आतापर्यंत तब्बल ६८ जागांवर विजय मिळवला असून ७० जागांवर पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत.

Karnataka Election Results 2023 Live Updates
Karnataka Election Results 2023 Live Updates (AFP)

Karnataka Election Results 2023 Live Updates : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. सत्ताधारी भाजपला पछाडत काँग्रेसने तब्बल १३७ जागांवर आघाडी घेत बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. भाजप ६४ जागांवर आघाडीवर असून जनता दल २१ जागांवर आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु आता भाजपच्या ऑपरेशन लोटसच्या भीतीने काँग्रेस नेत्यांनी विजयी आमदारांना कर्नाटकाच्या बाहेर हलवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत कर्नाटकात काँग्रेसचे ६८ उमेदवार विजयी झाले असून या सर्वांना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी हैदराबादेत हलवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तेलंगणातील अनेक हॉटेल्स बुक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजपाने जनता दल आणि काँग्रेसच्या अनेक आमदारांना फोडून सत्ता स्थापन केली होती. त्यामुळं निवडणुकीनंतर होणाऱ्या घोडेबाजाराचा काँग्रेसच्या शीर्ष नेत्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल आणि प्रवक्ते रणदीप सुरजेवाला हे गेल्या आठवड्याभरापासून कर्नाटकात ठाण मांडून बसलेले आहेत. त्यामुळं आता विजयी आमदारांशी भाजपचा संपर्क होऊ नये, यासाठी काँग्रेसने सर्व विजयी आमदारांना कर्नाटकाबाहेर म्हणजे तेलंगणाची राजधानी हैदराबादेत हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्नाटकातील सर्व जिल्ह्यांमधील विजयी आमदारांना तातडीने बंगळुरूत आणण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी टीम तयार केल्या आहे. तसेच धारवाड, बेळगाव आणि हुबळी यांसारख्या जिल्ह्यातून विजयी आमदारांना घेऊन येण्यासाठी हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळं आता विधानसभेच्या निकालानंतर कर्नाटकात राजकीय हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे सत्ता स्थापन करण्यासाठी आमच्याकडे प्लॅन बी तयार असल्याचं वक्तव्य भाजपच्या एका मंत्र्याने केलं आहे. त्यामुळंच आता काँग्रेसने सर्व विजयी आमदारांना हैदराबादेत हलवण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.

IPL_Entry_Point