मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  तुम्ही इतके सुंदर अन् बुद्धिमान कसे?; तरुणीच्या प्रश्नावर शशी थरूर यांचं मजेशीर उत्तर, म्हणाले…

तुम्ही इतके सुंदर अन् बुद्धिमान कसे?; तरुणीच्या प्रश्नावर शशी थरूर यांचं मजेशीर उत्तर, म्हणाले…

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 06, 2023 01:27 PM IST

Shashi Tharoor Viral Video : कॉंग्रेस नेते शशी थरूर यांच्या स्टाईलची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होत असते. एका कार्यक्रमात तरुणीनं याबाबत विचारलेल्या प्रश्नाला थरूर यांनी मजेशीर उत्तर दिलं आहे.

Shashi Tharoor Viral Video
Shashi Tharoor Viral Video (HT)

Shashi Tharoor Viral Video : कॉंग्रेसचे नेते आणि खासदार शशी थरूर यांच्या बुद्धिमत्तेची चर्चा केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात होत असते. अनेकदा त्यांनी विदेशात केलेली भाषणं सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. वयाची पन्नाशी ओलांडूनही शशी थरूर यांची स्टाईल एखाद्या अभिनेत्यासारखी असल्यामुळं तरुणाईमध्येही त्यांची चांगलीच क्रेझ आहे. परंतु आता सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात नागालँडच्या एका तरुणीनं त्यांना सुंदरतेचं आणि बुद्धिमत्तेचं रहस्य विचारलं आहे. त्यावर खासदार शशी थरूर यांनी अत्यंत मजेशीर उत्तर देत सर्वांना हसवलं आहे. त्यामुळं आता त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

खासदार शशी थरूर हे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागालँडला गेले होते. यावेळी कार्यक्रमात एका तरुणीनं त्यांना 'तुम्ही इतके सुंदर आणि बुद्धिमान कसे आहात?, त्याचं रहस्य काय आहे?', असा प्रश्न विचारला. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तरुणीच्या प्रश्नाला उत्तर देताना शशी थरूर म्हणाले की, तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना मी एवढंच म्हणू शकतो की, काही गोष्टींमध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही, परंतु काही गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही स्वत:ला बदलू शकता. तुम्ही कसं दिसता हे सर्व तुमच्या जीन्सवर अवलंबून असतं. त्यामुळं तुमच्या आई-वडिलांना हुशारीनं निवडायला हवं, असं म्हणत शशी थरूर यांनी सौंदर्याबद्दल प्रश्न विचारणाऱ्या तरुणीचीच फिरकी घेतली. थरूर यांचं उत्तर ऐकून उपस्थितांना हसू आवरेनासं झालं.

आपण कसं दिसतो यापेक्षा इतर गोष्टींवरही काम करायला हवं. विशेषत: चांगल्या पुस्तकांचं वाचन करायला हवं. मला लहानपणापासूनच वाचनाची प्रचंड आवड राहिलेली आहे. मी अनेक पुस्तकं वाचलेली आहेत. त्यामुळं मी जे वाचलं ते माझ्या नेहमीच लक्षात राहत असतं. अनोळखी लोकांसमोर बोलताना मला अवघडल्यासारखं व्हायचं, परंतु आता आत्मविश्वास वाढला आहे, असंही शशी थरूर यांनी म्हटलं आहे.

आपले विचार मांडण्यासाठी संबंधित विषयात गाढा अभ्यास असणं गरजेचं असतं. त्यासाठी सर्वात आधी आरशासमोर बोलण्याचा सराव करायला हवा. जेव्हा लोक तुमच्या भाषणांवर प्रतिक्रिया देतात, तेव्हा तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढत जातो. अनेक वेळा चूक झाल्यास त्यातून शिकता येईल. याशिवाय तुम्ही नेहमी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास देवही आपली मदत करत असतो, असंही थरूर यांनी कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे.

IPL_Entry_Point