मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Raju Shrivastav : कॉमेडीच नाही तर राजकारणातही आजमावलं नशीब, वाचा राजू श्रीवास्तवांचा राजकीय प्रवास

Raju Shrivastav : कॉमेडीच नाही तर राजकारणातही आजमावलं नशीब, वाचा राजू श्रीवास्तवांचा राजकीय प्रवास

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 21, 2022 03:05 PM IST

Comedian Raju Shrivastav Passed Away : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं आज निधन झालं आहे. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते.

Comedian Raju Shrivastav Passed Away
Comedian Raju Shrivastav Passed Away (HT)

Comedian Raju Shrivastav Passed Away : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं आज निधन झाल्यानं संपूर्ण मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी व्यायाम करत असताना त्यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु राजू श्रीवास्तव हे केवळ कॉमेडी किंवा मनोरंजन क्षेत्रापूरतेच मर्यादित नव्हते, त्यांनी राजकारणातही नशीब आजमावलं होतं. कसा होता त्यांचा राजकीय प्रवास, जाणून घेऊयात.

राजू श्रीवास्तव राजकारणात का आले?

राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांनी हुंडा दिला नाही म्हणून त्यांच्या बहिणीचं लग्न मोडलं होतं. याशिवाय लाच दिली नाही म्हणून त्यांच्या भावाला नोकरी मिळाली नव्हती. त्यामुळं राजकारणात येऊन सर्वसामान्य लोकांची मदत करण्याच्या उद्देशानं राजू श्रीवास्तव यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला.

कसा आहे राजकीय प्रवास?

राजू श्रीवास्तव यांनी २०१२ साली समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. त्यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सपाकडून कानपूर लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफरही देण्यात आली होती. परंतु त्यांनी तिकीट नाकारत निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी पक्षाध्यक्ष अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यादव यांना काही गोष्टी सांगितल्या होत्या, परंतु त्यावर अंमलबजावणी होत नसल्याचं पाहून राजू श्रीवास्तव यांनी समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

देशात मोठे निर्णय घेण्याची ताकद फक्त नरेंद्र मोदी यांच्यातच असल्याचं सांगत त्यावेळी त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. त्यांनी अनेकदा केजरीवाल यांच्या मफलरवरून विनोद केले होते. त्यानंतर पीएम मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांची स्वच्छ भारत अभियानच्या ब्रँड अँबेसिडरपदी निवड केली, त्यानंतर श्रीवास्तव यांनी अनेक शहरांमध्ये जाऊन अभियान राबवलं, त्यांचं काम पाहून भाजपनं त्यांना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान दिलं.

त्यांची यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी जवळीक होती. त्यामुळं त्यांना उत्तर प्रदेश सरकारनं फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जाही देण्यात आला होता. याशिवाय उत्तर भारतात चित्रपटांना चालना देण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या एका प्रकल्पात देखील राजू श्रीवास्तव यांनी काम केलं होतं.

IPL_Entry_Point