Gujarat Assembly Elections Results : गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणीला आज सकाळी आठ वाजेपासून सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या पहिल्या तासातच भाजनपं शंभरीपेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतल्यानं त्यामुळं हेच कल कायम राहिल्यास भाजप सलग सातव्यांदा गुजरातमध्ये सत्ता स्थापन करून नवा विक्रम रचण्याची शक्यता आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं ९९ आणि काँग्रेसनं ७७ जागांवर विजय मिळवला होता. परंतु आता मतमोजणीचे कल पाहून भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. परंतु आता गुजरात विधानसभेच्या निवडणुकीबाबत वर्तवण्यात आलेले सर्व एक्झिट पोल्स चुकीचे ठरून काँग्रेस गुजरातमध्ये १२० जागांवर विजय मिळवत बहुमतानं सत्ता स्थापन करेल, असा दावा काँग्रेसचे नेते आणि आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केला आहे.
मतमोजणीस सुरुवात होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, गुजरातमधील ही विधानसभा निवडणूक देशाला नवी दिशा देणार आहे. गेल्या २७ वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपचं सरकार आहे. मतमोजणीपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या अनेक एक्झिट पोल्समध्ये भाजपची सत्ता पुन्हा येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु विधानसभेचा निकाल लागल्यानंतर सर्व एक्झिट पोल्स चुकीचे ठरतील, असा दावा मेवाणींनी केला आहे. गुजरातमध्ये बदल आवश्यक असून बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधात लोकांनी भरभरून मतदान केलेलं असल्याचंही ते म्हणाले.
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर या तीन नेत्यांनी भाजपविरोधात रान पेटवलं होतं. त्यामुळं याचा भाजपला निकालात मोठा फटका बसला होता. त्यानंतर अल्पेश ठाकोर आणि हार्दिक पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर मेवाणी हे काँग्रेसमध्ये आले. त्यामुळं आता हे तिन्ही नेते वेगळ्या मार्गावर असताना गुजरातमध्ये कुणाची सरशी होईल, याबाबत अंदाज व्यक्त केला जात आहे.