BBC Documentary On 2002 Gujarat Riots : गुजरात दंगलीवर बीबीसीनं तयार केल्या डॉक्यूमेंट्रीवरून सध्या देशभरात राजकीय वादंग पेटलेलं आहे. बीबीसीच्या माहितीपटाच्या प्रसारणावर केंद्र सरकारनं बंदी घातल्यामुळं विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. परंतु आता बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवर ट्वीट केल्यानंतर पक्षानं ते ट्वीट डिलीट करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करत माजी मंत्री तथा काँग्रेसचे दिग्गज नेते एके अँटनी यांचे चिंरजीव अनिल अँटनी यांनी काँग्रेसमधील सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळं काँग्रेसला केरळमध्ये मोठा राजकीय धक्का बसला आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याचं जाहीर केलं आहे.
बीबीसीच्या गुजरात दंगलीवरील माहितीपटावर ट्वीट केल्यानंतर माझ्या असहिष्णुपणे पक्षातील काही नेत्यांनी दबाव आणला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे माझ्यावर ट्वीट डिलीट करण्यासाठी दबाव आणत होते. परंतु मी माझी भूमिका न बदलता पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा देत असल्याचं अनिल अँटनी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे. याशिवाय काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी त्यांच्या भूमिकेचं समर्थन केल्यामुळं अनिल अँटनींनी थरूर यांचंही आभार मानलं आहे. त्यामुळं आता बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवरून वाद सुरू असतानाच आता काँग्रेसला दक्षिण भारतात मोठा राजकीय धक्का बसला आहे.
बीबीसीनं गुजरातमधील दंगलीवर एक माहितीपट प्रदर्शित केला आहे. परंतु माहितीपटातून बीबीसी प्रपोगंडा पसरवत असल्याचा आरोप करत केंद्रातील मोदी सरकारनं त्यावर बंदी घातली आहे. परंतु आता विरोधकांनी या माहितीपटाच्या लिंक्स सोशल मीडियावर शेयर करत लोकांना डॉक्युमेंट्री पाहण्याचं आवाहन केलं आहे.