मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rahata Shirdi : दुचाकीसमोर सायकल आडवी घातल्यामुळं तरुणाची हत्या; धक्कादायक घटनेमुळं शिर्डीत खळबळ

Rahata Shirdi : दुचाकीसमोर सायकल आडवी घातल्यामुळं तरुणाची हत्या; धक्कादायक घटनेमुळं शिर्डीत खळबळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 05, 2023 06:16 PM IST

Shirdi Murder Case : किरकोळ वादातून आरोपींनी तरुणाची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना शिर्डीतून समोर आली आहे.

Murder Case In Rahata Shirdi
Murder Case In Rahata Shirdi (HT_PRINT)

Murder Case In Rahata Shirdi : रस्त्यावर तरुणानं दुचाकीसमोर सायकल आडवी घातल्याच्या किरकोळ कारणावरून शिर्डीजवळील राहाता शहरात एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे. इतर आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. काही दिवसांपूर्वीच शिर्डी परिसरात एका महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता शिर्डीजवळील राहाता शहरात भरदिवसा तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्यामुळं अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळं आता शिर्डी परिसरातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीजवळील राहाता शहरातील पंधराचारीमध्ये रोहित वर्मा नावाच्या तरुणानं आरोपींच्या दुचाकीसमोर सायकल आडवी लावली होती. त्यामुळं रोहित आणि आरोपींमध्ये शिवीगाळ झाली. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचल्यानं रोहितने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपींनी त्याचा पाठलाग करत धारदार शस्त्रानं वार करत त्याची भरदिवसा हत्या केली. रोहितची हत्या केल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. परिसरात मर्डर झाल्याची माहिती मिळताच राहाता पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत रोहितचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर कारवाई करत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

रोहितच्या हत्येनंतर पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून इतर आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. काही दिवसांपूर्वीच शिर्डीत हत्याकांडाची घटना समोर आली होती. त्यानंतर आता राहाता शहरातही तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्यामुळं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळं वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांनी वचक बसवावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

IPL_Entry_Point