मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune By Elections : पोटनिवडणुका बिनविरोध होतील हे डोक्यातून काढा; अजित पवारांनी भाजपला सुनावलं

Pune By Elections : पोटनिवडणुका बिनविरोध होतील हे डोक्यातून काढा; अजित पवारांनी भाजपला सुनावलं

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 05, 2023 10:29 PM IST

Pune Bypoll Elections : कसबा पेठ आणि चिंचवडमधील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar On Pune Bypoll Elections
Ajit Pawar On Pune Bypoll Elections (HT)

Ajit Pawar On Pune Bypoll Elections : भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांचं निधन झाल्यामुळं पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मविआने कसबा पेठची जागा कॉंग्रेसला तर चिंचवडची जागा राष्ट्रवादीला दिली आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपनेही दोन्ही जागांवर उमेदवार जाहीर केले आहे. परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला दोन्ही जागा बिनविरोध निवडून आणण्याची विनंती केली आहे. त्यानंतर आता यावर राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत भाजपला चांगलंच सुनावलं आहे.

भारतीय जनता पार्टीनं कोल्हापूर आणि देगलूरची जागा बिनविरोध होऊ दिली नव्हती. त्यामुळं चिंचवड आणि कसबा पेठ निवडणूक बिनविरोध करण्याचं काहीही कारण नाही. अंधेरीची निवडणूक बिनविरोध केली म्हणजे सर्वच पोटनिवडणुका बिनविरोध होईल, हे भाजप नेत्यांनी डोक्यातून काढून टाकायला हवं. ही लोकशाही आहे, लोकांना कुणाला मतदान करायचं ते करतील, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पोटनिवडणुका बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट करत भाजपवर जोरदार टोलेबाजी केली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका सातत्यानं पुढे ढकलल्या जात आहेत. आता महापालिकांच्या निवडणुका आणखी लांबण्याची शक्यता आहे. राज्यातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या, याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचं सांगत अजित पवारांनी पालिकेच्या निवडणुका तातडीनं घेण्याची मागणी केली आहे.

IPL_Entry_Point