मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jayant Patil NCP : मविआचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होणार?, जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Jayant Patil NCP : मविआचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होणार?, जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 13, 2023 04:23 PM IST

NCP Leader Jayant Patil : आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला किती जागा मिळतील?, याबाबतही जयंत पाटलांनी मोठा खुलासा केला आहे.

NCP Leader Jayant Patil On Mahavikas Aaghadi
NCP Leader Jayant Patil On Mahavikas Aaghadi (HT)

NCP Leader Jayant Patil On Mahavikas Aaghadi : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असतानाच आता सत्ताधारी भाजप-शिंदे गटासह महाविकास आघाडीनं विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाळीनंतर २०२४ मध्ये राज्यातील राजकारण संपूर्णत: बदललेलं असणार आहे. त्यामुळं आता मविआच्या नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाला पराभूत करण्याच्या दृष्टीनं रणनीती आखली आहे. परंतु आता २०२४ मध्ये महाविकास आघाडीची सत्ता आल्यास कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार?, याबाबतचा खुलासा खुद्द राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र येवून लढणार आहोत. त्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटप होणार आहे. मविआचं स्ट्राईक रेट चांगला ठेवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. परंतु २०२४ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यास ज्या पक्षाचं संख्याबळ जास्त असेल त्यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद जाणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.

२०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार निवडून आले तर मुख्यमंत्रीपद कुणाला द्यायचं, याबाबतचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेच घेणार असल्याचंही जयंत पाटील म्हणालेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीत सुशिक्षित पदवीधर आणि शिक्षकांनी महाविकास आघाडीच्या बाजूनं मतदान केलं. त्यामुळं आता आम्ही एकत्र असलो तर भाजपचा पराभव नक्कीच होणार असल्याचा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

भाजपला जास्तीत जास्त ६० जागा मिळतील- पाटील

आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त ६० जागा मिळतील, असं भाकीत जयंत पाटलांनी केलं आहे. याशिवाय भाजपकडे पीएम नरेंद्र मोदी यांच्या नावाशिवाय काहीही नाहीये. महाराष्ट्रात जे काही सुरूय त्यावरून जनतेच्या मनात प्रचंड चीड आहे. जनता हा राग मतपेटीतून व्यक्त करणार असल्याचंही राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणालेत.

IPL_Entry_Point