उद्धव ठाकरे यांनी शनिवारी धारावीतील पक्षातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.सबका साथ सबका विकास नाही तर 'सबका साथ मित्राचा विकास, असं सध्या सुरु आहे. मिठागरं आणि धारावी अदाणींच्या घशात घालण्याचा डाव पंतप्रधान मोदींचा असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
धारावीकरांना उचलून मिठागरात टाकायचं आणि धारावीत उपऱ्यांची वस्ती बसवून सगळा पैसा अदानीच्या खिशात घालण्याचा कट आहे. मात्र यात धारावीकरांनी काय पाप केलंय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. माझ्या धारावीकरांना हक्काचे घर मिळाले पाहिजे. ही आमची पहिली मागणी आहे. धारावीकर येथून कोठेही जाणार नाहीत. धारावीकरांना विकास पाहिजे आणि तो येथेच पाहिजे. तुम्हाला हे सोपे वाटत असेल की, घरे बांधेपर्यंत मिठागरात जागा दिली. पण एकदा का तुम्ही मिठागरात गेला की,परत तुम्हाला धारावी दिसणार नाही.
मी मुख्यमंत्री असताना माझ्या मुंबईकरांसाठी कांजूरमार्गची जागा मागत होतो. तेव्हा दिली नाही. पण आता पंतप्रधानांचे मित्र अदानीसाठी मुलुंडची, मिठागरांची जागा देऊन टाकली. कांजूरमार्गही मिठागराची जागा होती.
भाजपच्या आगामी लोकसभा निवडणुकीतील ४०० पार घोषणेवरून उद्धव यांनी जोरदार टोला लगावला. आपण शतक मारणार आहोत. यामुळे काहींना घाम फुटला आहे. ते ४०० पारचा नारा देत आहेत, मात्र आता अब की बार हद्दपारअशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.
सत्ताधारी लोक अजूनही लोकांना प्रलोभने दाखवत आहेत. यांचे बाळासाहेबांचे विचार आता समोर येत आहेत. दिल्लीश्वराची लाचारी करण्यासाठी त्यांना निधी मिळाला आहे.