मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  shiv sena-vanchit Alliance : शिवसेना-वंचित युतीची आज घोषणा?; ठाकरे-आंबेडकर घेणार पत्रकार परिषद

shiv sena-vanchit Alliance : शिवसेना-वंचित युतीची आज घोषणा?; ठाकरे-आंबेडकर घेणार पत्रकार परिषद

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 23, 2023 09:30 AM IST

Shiv Sena-Vanchit Alliance : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर उद्या संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळं उद्या वंचित आणि शिवसेनेच्या युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

vanchit bahujan aaghadi and shivsena alliance
vanchit bahujan aaghadi and shivsena alliance (HT)

vanchit bahujan aghadi and shiv sena alliance : गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती होणार असल्याच्या चर्चा आता अखेर संपण्याची शक्यता आहे. कारण आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात ते शिवसेना आणि वंचितच्या युतीची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेशी युती करणार असल्याचं वक्तव्य यापूर्वीच प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. त्यामुळं आता स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी विधानसभेच्या निवडणुकीतही वंचित आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी एक पत्रक जारी करत प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती माध्यमांना दिली आहे. त्यामुळं आता राज्यातील बड्या नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेकडे आता राज्याचं लक्ष लागलेलं आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीशी युतीची बोलणी सुरू केली होती. याशिवाय मुंबईतील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले होते. युतीच्या चर्चा होण्यापूर्वीच दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याचे संकेत दिले होते. त्यामुळं आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या जागावाटपाचा फॉर्म्यूला ठरल्यानंतर आता दोन्ही नेते आज युतीची अधिकृत घोषणा करणार असल्याचं वृत्त आहे.

काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदु मिल येथील स्मारकाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी 'आम्ही शिवसेनेवर फक्त लाईन मारतोय, अजून युतीबाबत काहीही ठरलेलं नाही', असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळं शिवसेना आणि वंचितच्या युतीबाबतचा संभ्रम वाढला होता. परंतु आता दोन्ही नेते एकत्र पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा करणार असल्यामुळं भाजपसह शिंदे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाशी (जोगेंद्र कवाडे गट) युती करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता शिवसेना आणि वंचितची युती होणार आहे.

IPL_Entry_Point