Shinde Group : मुख्यमंत्र्यांचा मराठवाड्यात मविआला धोबीपछाड; परभणीतील ८४ सरपंचांचा शिंदे गटात प्रवेश
Shinde Group Parbhani : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का दिला आहे.
Shinde Group vs Thackeray Group In Parbhani : शिंदे आणि ठाकरे गटात शिवसेनेच्या वर्चस्वाची लढाई सुरू असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यात महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का दिला आहे. परभणीतील तब्बल ८४ सरपंचांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळं आता बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रात वाढवण्यासाठी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं बालेकिल्ल्यात खच्चीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही खेळी केल्याचं बोललं जात आहे. शिंदे गटात प्रवेश केलेले सर्व सरपंच हे आमदार संतोष बांगर यांच्या मतदारसंघातील असल्याची माहिती समोर येत आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत परभणीतील ८४ सरपंचांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी व्यासपीठावर स्थानिक आमदार संतोष बांगर हे देखील उपस्थित होते. त्यानंतर गेल्या चार ते पाच महिन्यांपासून युती सरकारचं काम पाहून लोक आमच्या पक्षात येत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. केवळ परभणी किंवा हिंगोलीच नाही तर ठाणे, जिंतूर आणि राज्यातील अनेक भागातील पदाधिकारीस कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळं आता परभणीतील ८४ सरपंचांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळं आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांना शिवसेनेतील तब्बल ४० आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिंदे यांनी समर्थक आमदारांच्या पाठिंब्यावर भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या १८ पैकी १२ खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. कोकण, मुंबई, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि इतर भागातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता मोठ्या संख्येनं सरपंचांनीही शिंदे गटात प्रवेश केल्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.