Koyta Gang : पुण्यात कोयता गँगकडून लोकांवर हल्ले सुरूच; धायरीत अल्पवयीन मुलावर कोयत्यानं वार
Koyta Gang Case In Dhayari Pune : पुण्यातील अनेक भागांमध्ये कोयता गँगनं नागरिकांवर हल्ले केल्यामुळं शहरात दहशत वाढलेली आहे. त्यातच आता धायरीतही एका मुलावर कोयत्यानं वार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
Koyta Gang Case In Pune City : गेल्या महिन्याभरापासून पुण्यातील हडपसर, मांजरी, सिंहगड रोड, नाना पेठ आणि स्वारगेट या भागांमध्ये कोयता गँगनं धुमाकूळ घातलेला आहे. मध्यरात्री वाहनांवर आणि निष्पाप नागरिकांवर कोयत्यानं वार करून फरार होणाऱ्या टवाळखोर तरुणांना अटक करण्यासाठी पोलिसांकडून स्पेशल ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. तरीदेखील शहरातील कोयता हल्ल्याच्या घटना कमी झालेल्या नाही. मध्यरात्री दिसेल त्याच्यावर कोयत्यानं वार केल्याची घटना समोर आल्यानंतर आता धायरीतही कोयता गँगनं एका अल्पवयीन मुलावर कोयत्यानं वार केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळं आता शहरातील कायदा व सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील गर्दीचा भाग असलेल्या सिंहगड रोडवर फिर्यादी मुलगा आपल्या भावासोबत गप्पा मारत थांबलेला होता. त्यावेळी कोयता गँगच्या टोळक्यानं महिन्यांपूर्वी झालेल्या वादाचा जाब विचारत मुलावर कोयत्यानं वार करायला सुरुवात केली. आरोपींनी कोयत्यानं केलेला वार हा मुलाच्या मनगटावर बसला असून त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याशिवाय मुलाला कोयत्यानं जखमी केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. धायरीतील या घटनेनंतर फिर्यादी अल्पवयीन मुलानं सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिवे हे करत आहेत.
डिसेंबरमध्ये सिंहगड रोडवर तरुणांच्या टोळक्यानं भारती विद्यापीठ परिसरातील खाऊगल्लीत अनेकांवर कोयत्यानं वार करत दहशत निर्माण केली होती. आरोपींनी गाड्यांची तोडफोड करत अनेक हातगाड्या फोडल्या होत्या. त्यावेळी पोलिसांनी सर्वांसमोर आरोपींना तुडवलं होतं. परंतु तरीदेखील पुण्यातील कोयता गँगची दहशत काही थांबत नाहीये. शहरातील नागरिक भीतीच्या छायेत घराबाहेर पडत असल्यामुळं पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.