मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amravati Crime News : पेमेंट घेऊन निघालेल्या शेतकऱ्यावर चोरट्यांचा हल्ला, बेदम मारहाण करत लाखोंचा मुद्देमाल लुटला

Amravati Crime News : पेमेंट घेऊन निघालेल्या शेतकऱ्यावर चोरट्यांचा हल्ला, बेदम मारहाण करत लाखोंचा मुद्देमाल लुटला

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jun 07, 2023 12:17 PM IST

Amravati Crime News : कृषी उत्पन्न बाजार समितीतून पेमेंट घेऊन निघालेल्या शेतकऱ्याला चोरट्यांनी गाठून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

Amravati Crime News Marathi
Amravati Crime News Marathi (HT_PRINT)

Amravati Crime News Marathi : कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची विक्री करून घरी परतणाऱ्या शेतकऱ्याला चोरट्यांनी बेदम मारहाण करत त्याला लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदुऱ्यात ही घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध घेतला आहे. चोरट्यांनी शेतकऱ्याकडील अडीच लाखांची रोकड आणि दागिने हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला आहे. त्यामुळं आता या धक्कादायक घटनेमुळं अमरावतीत खळबळ उडाली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. नांदुऱ्यातील जकात नाका परिसरात ही घटना घडली आहे. चोरट्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याला मार लागला असून त्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील नांदुरा येथील शेतकरी संजीव सौदागर यांनी नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची विक्री केली. त्यानंतर मालाचे पैसे मिळाल्यानंतर ते घराच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी चार ते पाच चोरट्यांनी त्यांना रस्त्यातच गाठून शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी संजीव यांना दगड-विटांनी मारहाण करत जखमी केलं. त्यानंतर त्यांच्याकडील अडीच लाखांची कॅश आणि दागिने घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी शेतकरी संजीव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करत प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

शेतकऱ्याला मारहाण करत लाखो रुपयांची लूट झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी कठोरा मार्गावरील झोपडपट्टीतील संशयितांची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केलेली आहे. चोरट्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच अमरावतीत एका महिलेला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर आता नांदुऱ्यात एका शेतकऱ्याला मारहाण करत लाखो रुपयांची लूट करण्यात आल्यामुळं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

 

IPL_Entry_Point