मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut: संजय राऊत इतके आक्रमक का झालेत?; राजकीय जाणकार म्हणतात…

Sanjay Raut: संजय राऊत इतके आक्रमक का झालेत?; राजकीय जाणकार म्हणतात…

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 28, 2022 06:50 PM IST

Sanjay Raut: शिवसेनेतील बंडाळीनंतर खासदार संजय राऊत हे भलतेच आक्रमक झाले आहेत. बंडखोर आमदारांवर ते शेलक्या शब्दांत टीका करत आहेत.

Sanjay Raut
Sanjay Raut

Why Sanjay Raut become so aggressive?: शिवसेनेत झालेल्या बंडानंतर खासदार व पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत कमालीचे आक्रमक झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर ते आग ओकत आहेत. त्यामुळं त्यांच्यावर टीकाही होत आहे. राऊत यांच्यामुळं शिवसेनेचं नुकसान होत असल्याचं बंडखोर आमदार म्हणत आहेत. मात्र, संजय राऊत हे मागे हटायला तयार नाहीत. शिवसैनिकांचे मेळावे घेऊन ते बंडखोरांवर तोफा डागत आहेत. ते इतके आक्रमक का झाले आहेत? उद्धव ठाकरे हे त्यांना का थांबवत नाहीत? खरंच संजय राऊत यांच्यामुळं शिवसेनेचं नुकसान होतंय का? यावर एक दृष्टिक्षेप…

ट्रेंडिंग न्यूज

संजय राऊत हे एरवीही आक्रमकपणे पक्षाची बाजू लावून धरतात. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ते सातत्यानं पक्षाची आणि सरकारची बाजू लढवत आहेत. भाजपच्या आरोपांना एकाकी तोंड देत आहेत. आता पक्ष फुटल्यानंतर त्यांनी बंडखोरांना थेट आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. बंडखोर कसे आडाणी आहेत, शिवसेनेनं त्यानं किती भरभरून दिलं याचा पाढा ते शिवसैनिकांच्या मेळाव्यात, पत्रकार परिषदांमध्ये व टीव्हीवरील मुलाखतीत वाचत आहेत.

महाविकास आघाडी स्थापन करण्यामध्ये संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे. हे सरकार पाच वर्षं चालावं असा त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. एकनाथ शिंदे व अन्य काही लोकांनी त्यांच्या याच प्रयत्नांना सुरुंग लावल्यानं ते संतापले आहेत.

राजकीय जाणकारांच्या मतानुसार, संजय राऊत यांची आताची आक्रमक भूमिका ही काळाची गरज आहे. पक्षात फूट पडल्याच्या पहिल्या दिवशी राऊत यांनी बंडखोरांच्या विरोधात कुठलंही विधान केलं नव्हतं. कारण, पहिल्या दिवशी माघारीची चाचपणी सुरू होती. मात्र, ते प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आता लढण्याशिवाय पर्याय नसल्याचं शिवसेनेच्या लक्षात आलं. त्यानंतर संजय राऊत यांनी बंडखोरांवर हल्ले सुरू केले.

पक्षाचे ४० हून अधिक आमदार निघून गेल्यानंतर शिवसेना संपली अशी चर्चा सुरू झाली होती. तशी चर्चा जाणीवपूर्वक पसरवली जात होती. त्यामुळं आताही आपण शांत राहिल्यास शिवसेना घाबरली, असा समज पसरण्याचा धोका होता. शिवसैनिकांचं मनोधैर्य खच्ची होण्याची शक्यता होती. त्यामुळंच संजय राऊत शेलक्या शब्दांत बंडखोरांवर टीका करू लागले. कुत्रा सोडला तर कुणीही बेईमान होऊ शकतो, असं ते एका मुलाखतीत म्हणाले. आदित्य ठाकरे यांचीही त्यांना साथ मिळाली. एरवी कुठलंही राजकीय भाष्य क्वचितच करणारे आदित्य ठाकरे हे शिवसैनिकांच्या मेळाव्यातून आव्हानाची भाषा करू लागले. त्यातून शिवसैनिकांमध्ये विश्वास वाढला व शिवसैनिक रस्त्यावर उतरू लागले.

संजय राऊत हे सातत्यानं पुढं येऊन शिवसेनेची बाजू मांडत आहेत. त्यामुळं बंडखोर आमदार त्यांना लक्ष्य करून शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. संजय राऊत हे राष्ट्रवादीच्या नादी लागून शिवसेना संपवत असल्याचं चित्र उभं केलं जात आहे. राजकीय जाणकारांचं मत याबाबतीत नेमकं उलट आहे. 'खरं तर संजय राऊत हे जी काही भूमिका मांडत आहेत, ती पक्षाच्या वतीनं मांडत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेलं असल्यामुळं शिवसैनिकांना नेमकी काय भाषा आवडते हे संजय राऊत यांना पक्कं माहीत आहे. त्यांच्या या भाषेमुळं बंडखोर दुखावत असले तरी शिवसैनिक सुखावत आहेत. संजय राऊत यांच्यामुळं पक्षाचं नुकसान होत असतं तर विरोधकांकडून त्यांच्यावर टीका झालीच नसती. याउलट, त्यांना शांत करण्यासाठी प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. ईडीचं समन्स हा त्याचाच एक भाग असावा असंही अनेकांचं मत आहे. पक्षासाठी अटक करून घ्यायचीही तयारी त्यांनी ठेवली आहे. त्यामुळं त्यांच्यामुळं पक्षाचं नुकसान होतंय असं म्हणता येत नाही, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

संजय राऊत इतके आक्रमक झाले असताना उद्धव ठाकरे हे त्यांना थांबवत का नाहीत, असा प्रश्न काहींना पडू शकतो. त्याचं उत्तर खुद्द उद्धव ठाकरे यांनीच आपल्या दोन भाषणांतून दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनीही बंडखोरांवर तितकीच जोरकस टीका केली आहे. त्यामुळं संजय राऊत यांची आक्रमकता ही शिवसेनेच्या रणनीतीचाच एक भाग आहे, असं जाणकारांना वाटतं. सरकार पडलं तरी बेहत्तर, शेवटपर्यंत लढत राहायचं असंच शिवसेनेनं ठरवल्याचं दिसत आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या