मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Khadakwasla Dam : पुण्यातील खडकवासला धरणात तब्बल ९ मुली बुडाल्या, मदत व बचावकार्य सुरू

Khadakwasla Dam : पुण्यातील खडकवासला धरणात तब्बल ९ मुली बुडाल्या, मदत व बचावकार्य सुरू

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 15, 2023 11:47 AM IST

Khadakwasla Dam : पोहण्यासाठी गेलेल्या तब्बल नऊ तरुणी पुण्यातील खडकवासला धरणात बुडाल्याची घटना समोर आली आहे.

Khadakwasla Dam Pune
Khadakwasla Dam Pune (HT)

Khadakwasla Dam Pune : पुण्यातील खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तब्बल ९ मुली बुडाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर आता स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी मदत व बचावकार्य सुरू केलं असून सात तरुणींना वाचवण्यात यश आलं आहे. अद्याप दोन तरुणी बेपत्ता असून त्यांना शोधण्याचं काम जारी असल्याची माहिती आहे. पुणे महापालिका तसेच पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यानंतर आता स्थानिकांच्या सहाय्याने उर्वरीत दोन बेपत्ता तरुणींचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी अत्याधुनिक बोटींचा वापर केला जात आहे. हवेली पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोऱ्हे-खुर्द गावाच्या हद्दीतील कलमाडी फार्म हाऊस जवळ खडकवासला धरणात पोहण्यासाठी नऊ तरुणी गेल्या होत्या. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळं सर्व तरुणी धरणात बुडाल्या. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सात तरुणींना वाचवलं आहे. तर अद्याप दोन तरुणी बेपत्ता आहे. आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांना तरुणी बुडाल्याची माहिती समजताच त्यांनी पाण्यात उड्या टाकून मुलींना वाचवलं आहे. त्यानंतर आता आता उर्वरीत दोन तरुणींचा जवानांसह स्थानिकांकडून शोध घेतला जात आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सिंहगड किल्ला आणि खडकवासला धरण परिसर पुढील आदेशापर्यंत पर्टकांसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळं आता पर्यटकांना बंदी असताना तरुणी धरणात पोहण्यासाठी कशा गेल्या?, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यानंतर आता खडकवासला धरण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

IPL_Entry_Point

विभाग