मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : पुण्यात निवृत्त पोलिस अधिकाऱ्याची फसवणूक; जमीन देण्याच्या बहाण्याने ६० लाखांनी गंडवले

Pune Crime : पुण्यात निवृत्त पोलिस अधिकाऱ्याची फसवणूक; जमीन देण्याच्या बहाण्याने ६० लाखांनी गंडवले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 28, 2023 12:10 PM IST

Pune Crime : पुण्यात एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याची जमीन देण्याचा बहाण्याने फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल ६० लाख रुपयांनी गंडवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune crime
Pune crime (HT_PRINT)

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात स्वस्त दरात शेतजमीन विकत घेऊन देतो अशी थाप मारत तब्बल ६० लाख रुपये घेऊन एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. एवढेच नाही तर पैसे परत मागितल्यावर या पोलिस अधिकाऱ्यालाच धमकावून आर्थिक नुकसान करण्याची भीती घालून आणखी ६ लाख रुपयांची खंडणी देखील उकळल्याने खळबळ उडाली आहे.

राजेश अंकुश पोटे, संदेश अंकुश पोटे, प्रियांका नीलेश सूर्यवंशी (सर्व रा. कुदळे पाटील रेसिडेन्सी, वडगाव बुद्रुक) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. फसवणुकीचा हा प्रकार जानेवारी २०१५ पासून सुरू होता. या प्रकरणी आंबेगाव येथे राहणाऱ्या एका ५९ वर्षीय निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश पोटे, संदेश पोटे व प्रियांका पोटे यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून भोर येथे स्वस्त दरात शेतजमीन विकत घेऊन देतो, अशी बतावणी त्यांनी केली. या साठी त्यांच्याकडून ६० लाख रुपये घेतले. मात्र, त्यांना शेतजमीन खरेदी ंन करता त्यांची फसवणूक केली. त्यांनी परत पैसे मागितल्यावर त्यांच्या भोसलेनगर येथील राहत्या घरी येऊन त्यांना पैसे देत नसल्याचे आरोपींनी धमकावले.

एवढेच नाही तर आर्थिक नुकसान करण्याची भीती त्यांना घातली. आरोपींनी फिर्यादी हे सहायक पोलिस आयुक्त असताना मार्च २०२१ मध्ये आणखी ६ लाख रुपयांची खंडणी घेतली. या पोलिस अधिकाऱ्याने निवृत्त झाल्यानंतर आता याप्रकरणी तक्रार दिली असून त्यानुसार फसवणूक व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

WhatsApp channel