मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ghota Hingoli : पोळ्या लाटण्याच्या बहाण्यानं महिलांसोबत धक्कादायक प्रकार; पोलिसांकडून आरोपीला अटक

Ghota Hingoli : पोळ्या लाटण्याच्या बहाण्यानं महिलांसोबत धक्कादायक प्रकार; पोलिसांकडून आरोपीला अटक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 05, 2023 06:39 PM IST

Ghota Hingoli Crime News : कारमध्ये बसवून अज्ञातस्थळी नेत आरोपीनं महिलांसोबत धक्कादायक प्रकार केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळं हिंगोलीत खळबळ उडाली आहे.

Ghota Hingoli Crime News Marathi
Ghota Hingoli Crime News Marathi (HT_PRINT)

Ghota Hingoli Crime News Marathi : औरंगाबादेतील बलात्काराची घटना ताजी असतानाच आता हिंगोलीत पोळ्या लाटण्याच्या बहाण्यानं आरोपीनं अज्ञातस्थळी नेत गळ्यातील सोनं लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं हिंगोली जिल्ह्यातील घोटा परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतर आरोपींचा कसून शोध सुरू केला आहे. आरोपींनी तीन महिलांकडून १ लाख ३४ हजार रुपये किंमतीचे सोने लंपास केले असून त्यानंतर आता महिलांनी आरोपींविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील घोटा परिसरातील शांताबाई शेळके यांच्यासह दोन महिला गेल्या अनेक दिवसांपासून लग्नसोहळ्यांमध्ये पोळ्या लाटण्याचं काम करतात. त्यातून येणाऱ्या मजुरीतूनच त्यांचा उदरनिर्वाह होत असल्यामुळं जिल्ह्यातील अनेक ठिकाणी त्या पोळ्या लाटण्यासाठी जात होत्या. आरोपी सुखदेव शिरामे याने महिलांशी ओळख करत त्यांना पोळ्या लाटण्याचा कामासाठी बोलावलं होतं. महिलांनी होकार दिल्यानंतर आरोपीनं त्यांना कारमध्ये बसवून अज्ञातस्थळी नेलं. यावेळी आरोपी शिरामे यांच्यासोबत आणखी दोन जण होते. चाकूचा धाक दाखवत आरोपींनी महिलांकडील १ लाख ३४ हजार रुपयांचे दागिने हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला.

आरोपींनी सोनं चोरल्यामुळं घाबरलेल्या महिलांनी घडलेला सारा प्रकार गावातील लोकांना आणि नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर ग्रामस्थांनी महिलांसह पोलीस ठाणे गाठत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करत एका आरोपीला तातडीनं बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर आता फरार असलेल्या दोन आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण नागरे, जमादार हेमंत दराडे, डवळे, पी. एस. पाचपुते यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग