मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Bypoll Election : चिंचवड आणि कसब्यात राष्ट्रवादीचे उमेदवार लढणार?, अजित पवार स्पष्टच बोलले!

Pune Bypoll Election : चिंचवड आणि कसब्यात राष्ट्रवादीचे उमेदवार लढणार?, अजित पवार स्पष्टच बोलले!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 21, 2023 03:32 PM IST

Pune Bypoll Election : पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात येत्या २६ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी आता राष्ट्रवादीनंही रणनीती आखायला सुरुवात केली आहे.

LOP Ajit Pawar On Kasba Peth And Chinchwad Bypoll Election
LOP Ajit Pawar On Kasba Peth And Chinchwad Bypoll Election (HT)

LOP Ajit Pawar On Kasba Peth And Chinchwad Bypoll Election : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर आता पुण्यातील चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळं आता दोन्ही मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी भाजपसह राष्ट्रवादीनंही रणनीती आखायला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकांना एक दोन वर्षांचा कालावधी उरलेला असताना आता या दोन्ही जागा जिंकण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीनं प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पुण्यातील या दोन्ही मतदारसंधातील पोटनिवडणूक बिनविरोध होण्याबाबत शंका व्यक्त केली आहे.

पुण्यात माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुका लढवण्याची आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळं याबाबत सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईत याबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा केली जाणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांशी आज चर्चा करणार असून कसब्यातूनही काही लोकांच्या भेटी घेणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक हे लढण्यास इच्छुक असून त्याबाबतचा निर्णय भाजप घेईल. त्यात आम्ही नाक खुपसणं गरजेचं नाही. परंतु आता पुण्यातील या दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणूक लढण्याचा आग्रह आमच्या कार्यकर्त्यांनी केलेला असल्यामुळं या निवडणुका बिनविरोध होईल की नाही, याबाबत मला शंका असल्याचंही पवार म्हणाले.

पोटनिवडणुकीसाठी कोणत्या नावांची चर्चा?

चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार लढवण्याचा ठराव प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीनं काही स्थानिक नेत्यांशीही चर्चा केली असून त्यामध्ये नाना काटे आणि भाऊसाहेब भोईर या नेत्यांचं नाव चर्चेत आहे. याशिवाय २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतून बंडखोरी करत निवडणूक लढणाऱ्या राहुल कलाटे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता चिंचवडच्या जागेवरून ठाकरे गट आणि राष्ट्रवादीत संघर्ष होण्याची चिन्हं आहेत.

पुण्याचा मध्यवर्ती भाग असलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळं भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कसब्यातून धीरज घाटे, हेमंत रासने आणि शैलेश टिळक यांची तर राष्ट्रवादीकडून रुपाली पाटील ठोंबरे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळं आता कोणता पक्ष कोणत्या उमेदवाराला रिंगणात उतरवणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे.

IPL_Entry_Point