मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PM Modi: पंतप्रधान मोदींच्या सभेत प्रवेश करणाऱ्या तोतया सैनिकाला अटक

PM Modi: पंतप्रधान मोदींच्या सभेत प्रवेश करणाऱ्या तोतया सैनिकाला अटक

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 21, 2023 02:20 PM IST

Narendra Modi Mumbai Rally: मोदींची १९ जानेवारीला मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथे पार पडलेल्या सभेत प्रवेश करणाऱ्या तोतया सैनिकाला पोलिसांनी अटक केली आहे.

Arrested
Arrested (HT_PRINT)

Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरूवारी (१९ जानेवारी 2023) मुंबईत विविध विकास कामाचं उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. नरेंद्र मोदी या सभेला पोहचण्याच्या ९० मिनिटांपूर्वी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. आरोपीने एनएसजीचे बनावट ओळखपत्र दाखवून एमएमआरडीए मैदानावर आयोजित पंतप्रधानांच्या कार्यक्रमात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना त्याच्यावर वेगळाच संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो तोतया सैनिक असल्याचे उघड झाले.

रामेश्वर मिश्रा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नरेंद्र मोदींच्या सभेच्या दीडतास अगोदर आरोपीने सैनिक असल्याचे सांगत व्हीआयपी परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना त्याच्यावर वेगळाच संशय आला आणि त्यांनी आरोपीला थांबवले. व्हीआयपी परिसरात प्रवेश करण्यापूर्वी तो इकडे तिकडे फिरत असल्याने गुन्हे शाखेने त्याच्यावर अर्धातास नजर ठेवली. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने १३ जानेवारी रोजी जारी केलेले एलिट नॅशनल सिक्युरिटी गार्डचे ओळखपत्र घातल्याचे त्यांच्या लक्षात आले, तेव्हा संशय निर्माण झाला. त्यात त्याला "रेंजर" म्हणून पोस्ट करण्यात आल्याचे दिसून आले. परंतु, आयकार्डच्या रिबनवर 'दिल्ली पोलीस सुरक्षा' असे लिहिले होते.

आरोपीची कोठडीत रवानगी

आरोपी रामेश्वर मिश्राने दावा केला की तो, एनएसजीच्या पठाणकोट हबमध्ये प्रतिनियुक्तीवर होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास करण्याचा निर्णय घेतला. चौकशीत त्यांचे ओळखपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले. मिश्रा यांच्यावर आयपीसी कलम १७१, ४६५, ४६८ आणि ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी शुक्रवारी वांद्रे न्यायालयात हा खटला सादर केला असता न्यायालयाने त्याला २४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

IPL_Entry_Point