मुंबईत धुलिवंदनाच्या उत्साहाला गालबोट लागले असून माहीमच्या समुद्रात ५ जण बुडाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. समुद्रात बुडालेल्या पाच पैकी ४ तरुणांना वाचविण्यात यश आले असून एक जण बेपत्ता आहे. बेपत्ता तरुणाचा शोध घेतला जात आहे. सर्व तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, होळी खेळून सायंकाळच्या सुमारास काही तरुण माहीम समुद्र किनाऱ्यावर आंघोळीसाठी आले होते. हे तरुण पोहण्यासाठी समुद्रात उतरले मात्र समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाच तरुण समुद्रात ओढले गेले व सर्वजण बुडाले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पाच तरुण बुडाल्याचे किनाऱ्यावरील लोकांनी पाहिले. त्यांनी यातील ४ जणांना वाचवले. यातील २ तरुण सुखरुप असून दोघांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक तरुण अजूनही बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे. यश कागडा असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. तर हर्ष किंजले असे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी माहीम पोलीस, अग्निशामक दलाचे पथक, सागरी पोलीस आणि स्वयंसेवक उपस्थित असून बेपत्ता मुलाचा शोध घेतला जात आहे.