Mumbai local train news : नेरूळ स्टेशनजवळ एका प्रवाशाला लोकल ट्रेनमधून (Local Train) खाली ढकलून दिल्याची घटना ताजी असतानाच आता मध्य रेल्वेवर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहेत. मध्य रेल्वे लाईनवर खडवली व वाशिंद स्थानकादरम्यान नशेखोर तरुणांनी एका प्रवाशाचा चाकूने वार करून त्याची हत्या केली आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशात खळबळ माजली आहे. . दत्तात्रय भोईर असं खून करण्यात आलेल्या प्रवाशाचं नाव आहे. ते शहापूर जवळील साजिवली गावात रहात होते.
आरोपी चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुटत होते तसेच मारहाण करत होते, याचा विरोध केल्यामुळे दत्तात्रय यांचा खून करण्यात आला. या घटनेनंतर खडवली रेल्वे स्थानकावर सर्व प्रवाशांनी हल्लेखोर दोन तरुणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपींविरोधात कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे
मिळालेल्या माहितीनुसार खडवली आणि वाशिंद रेल्वे स्थानकाच्या दरम्यान तीन ते चार तरुणांनी लोकल ट्रेनमध्ये दारूच्या नशेत तरुणांनी हैदोस घातला होता. ही घटना २७ एप्रिलच्या मध्यरात्रीची आहे. या तरुणांनी लोकलमधील प्रवाशांचा मोबाईल आणि सोन्याच्या चेन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. जे प्रवासी याला विरोध करत होते त्यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण केली जात होती. त्याच लोकलच्या दत्तात्रय भोईर प्रवास करत होते. त्यांनी या तरुणांना विरोध केल्यानंतर नशेखोर तरुणांपैकी एकाने त्यांना पट्ट्याने मारहाण करत त्यांच्यावर चाकूने वार केला. या घटनेनंतर खडवली रेल्वे स्थानकावर सर्व प्रवाशांनी दोन तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
या घटनेत जखमी झालेले दत्तात्रय भोईर यांचा आज (गुरुवार) सकाळी सहा वाजता ठाण्यातील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. दत्तात्रय भोईर २७ एप्रिल रोजी नातेवाईकाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी उल्हासनगरला आले होते. कार्यक्रम आटोपून ते कल्याणमधून कसारा लोकलने शहापूरकडे जात होते. त्यावेळी वाशिंद आणि खडवली रेल्वे स्थानकादरम्यान हा प्रकार घडला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे रात्री प्रवाशांनी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.