नवी मुंबईतील वाशी येथे एका कार्यक्रमाचे वार्तांकन करतेवेळी टीव्ही न्यूज चॅनलच्या एका कॅमेरामनने विनयभंग केल्याचा आरोप ३२ वर्षिय महिला पत्रकाराने केला आहे. या कॅमेरामनविरोधात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार दुपारी तीनच्या सुमारास नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व पत्रकार सिडको एक्झिबिशन सेंटरच्या व्हीआयपी गेटच्या बॅरिकेडजवळ उभे होते. सभास्थळाहून बाहेर येणाऱ्या राजकीय नेत्यांच्या मुलाखत घेण्यासाठी (byte) सर्व पत्रकार वाट पाहत होते. दरम्यान, सचिन शिंदे नावाच्या कॅमेरामनने बॅरिकेडिंगच्या पलीकडे जाण्यासाठी फिर्यादी महिला पत्रकाराला धक्काबुक्की करून तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. धक्काबुक्कीच्या धक्क्याने तक्रारदार महिला पत्रकार दुसऱ्या एका महिला पत्रकारावर पडली. संतापलेल्या महिला पत्रकारांनी कॅमेरामनला या कृत्याबद्दल विचारणा केली असता शिंदे याने त्यांना शिवीगाळ करून त्यांचा अपमान केला, अशी तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली आहे. कॅमेरामनने मला केवळ सार्वजनिक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला नाही, तर तेथील इतर पत्रकारांसमोर अपशब्द वापरून माझा अपमानही केला. वागणुकीबद्दल त्याच्या माफीची मागणी केली असता त्याने अपशब्द वापरले. असं फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, महिला पत्रकाराच्या तक्रारीवरून रविवारी एफआयआर दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी आरोपीला फोन करून पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले होते. या प्रकरणात पोलिसा आरोपीला नोटीस देणार होते. परंतु आरोपी कॅमेरामन आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. आता पुन्हा फोन करून बोलावणार असल्याची माहिती वाशी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर भट्टे यांनी दिली. शिंदे यांच्याविरोधात भादंवि कलम ३५४ (महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने मारहाण करणे) आणि ५०४ (शांतता भंग करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक अपमान करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संबंधित बातम्या