Ashish Shelar : आमचे बापजादे काढणारे उद्धव ठाकरे स्वत:च्या भावांना…; आशिष शेलार यांची व्यक्तिगत टीका
Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टीकेनं घायाळ झालेल्या भाजपनं त्यांच्यावर वैयक्तिक हल्ला चढवला आहे.
Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी हे मुंबई महापालिकेवर दरोडा टाकणारे डाकू आहेत. या डाकूंपासून मुंबईला मुक्त करणं हे भारतीय जनता पक्षाचं मिशन आहे, अशी जहरी टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मुंबईतील ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून शिवसेनेनं काल मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर टीकेची तोफ डागली. भाजपवाल्यांसाठी मुंबई ही सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे आणि ते ती कापायला निघालेत, आम्ही ते कदापि होऊ देणार नाही, असा आवाज उद्धव ठाकरे यांनी काल दिला. त्यांच्या या टीकेचा शेलार यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे.
'उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे आदळाआपट थयथयाट आणि नृत्य आहे. मुंबई महापालिकेच्या ठेवी सुरक्षित राहिल्या याचं कारण भाजपनं पारदर्शी पद्धतीनं चौकीदारी केली हे आहे. त्यामुळं शिवसेनेला ठेवींवर दरोडा टाकता आला नाही, असा दावा शेलार यांनी केला. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजीसारखी चालवली. धनदांडग्या शेठजीसाठी कामं केली. कधी ताजला सूट द्या, कधी बिल्डरांना प्रीमियममध्ये सूट द्या, बार मालकांना सूट द्या. ठेकेदारांना सूट द्या. त्या ठेकेदारांसाठीच उद्धव ठाकरे भाजपला लक्ष्य करत आहेत. त्यांचा वैचारिक स्वैराचार हा इतिहासात नोंदला जाईल, असं शेलार म्हणाले.
उद्धव ठाकरे स्वत:च्या कुटुंबालाही एकत्र ठेवू शकले नाहीत!
आशिष शेलार यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीकाही केली. 'आमचे बापजादे काढणारे उद्धव ठाकरे हे एक अपयशी नेते आहेत. ते स्वतःच्या कुटुंबाला एकत्र ठेवू शकले नाहीत. भाऊ, चुलत बंधू यांनाही ते एकत्र ठेवू शकले नाहीत. कौटुंबिक स्तरावर ते अपयशी झालेच, पण पक्षही ते एकत्रित ठेवू शकले नाहीत. गणेश नाईक ते नारायण राणे सगळे त्यांच्यावर आरोप करून बाहेर पडले. कुटुंब आणि पक्षानंतर सरकारही ते एकत्र ठेवू शकले नाहीत, अशी खोचक टीका शेलार यांनी केली.