मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shraddha Walker : ठाकरेंच्या काळजात मराठीपणाची काळजीच उरली नाही; आशिष शेलारांनी थेट पुरावेच दिले
Ashish Shelar On Shraddha Walker Murder Case
Ashish Shelar On Shraddha Walker Murder Case (HT)

Shraddha Walker : ठाकरेंच्या काळजात मराठीपणाची काळजीच उरली नाही; आशिष शेलारांनी थेट पुरावेच दिले

26 December 2022, 10:40 ISTAtik Sikandar Shaikh

Ashish Shelar vs Uddhav Thackeray : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणावरून भाजप नेते आशिष शेलारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Ashish Shelar On Shraddha Walker Murder Case : दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या आहेत. शिंदे गटानं घेतलेल्या ५० खोक्यांची चौकशी करण्याची मागणी खासदार संजय राऊतांनी केल्यानंतर आता भाजप नेते आशिष शेलारांनी श्रद्धा वालकर प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जोरदार टीका केली आहे. ट्वीटवरून प्रश्नांची सरबत्ती करत शेलार यांनी शिवसेनेवर आगपाखड केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, आझाद काश्मिरवाल्या मेहक प्रभूला जे क्लीनचीट देतात, उमेश कोल्हेचा गळा चिरणाऱ्यांना जे संरक्षण देतात त्यांना श्रद्धा वालकरबद्दल हळहळ वाटू नये?, काळजात ज्यांच्या मराठीपणाची काळजीच उरली नाही मुंबईकर हो, आता तुम्ही सांगा?, असा सवाल करत आशिष शेलारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. याशिवाय श्रद्धा वालकर प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यासाठी प्रकरण जलदगती कोर्टात चालवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना विनंती करणार असल्याचंही शेलार म्हणाले.

यापूर्वी भाजप नेते आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं होतं, त्यात त्यांनी म्हटलं होतं की, आफताब पुनावाला श्रद्धाला मारणार असल्याची माहिती तिनं महाराष्ट्र पोलिसांना केली होती, परंतु महाराष्ट्र पोलिसांनी तिच्या पत्राची दखल घेतली नाही. त्यावेळी पोलिसांवर कुणाचा दबाव होता?, त्यावेळी तात्कालीन महाविकास आघाडी सरकारनं आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला का?, याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली होती.

आदित्य ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेची टीम नागपुरात दाखल

सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटानं दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंना लक्ष्य करायला सुरुवात केलेली असतानाच आता शिवसेनेनं त्यांना पाठिंबा देण्यासाठी स्पेशल टीम नागपुरात पाठवली आहे. त्यात खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांचा समावेश आहे. त्यामुळं आता दिशा सालियन प्रकरणावरून भाजप आणि शिवसेनेत हिवाळी अधिवेशनात राजकीय रणकंदन पाहायला मिळण्याची शक्यता आहे.