मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vedanta : 'परदेशात उद्योजकांना भेटून प्रकल्प येत नाही, त्यासाठी...', उदय सामंतांचा ठाकरेंवर पलटवार

Vedanta : 'परदेशात उद्योजकांना भेटून प्रकल्प येत नाही, त्यासाठी...', उदय सामंतांचा ठाकरेंवर पलटवार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 15, 2022 11:50 AM IST

Vedanta Foxconn Project : वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातमध्ये हलवण्यात आल्यानंतर आता उद्योगमंत्री उदय सामंतांनी थेट आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

Vedanta Foxconn Semiconductor Project
Vedanta Foxconn Semiconductor Project (HT)

Vedanta Foxconn Semiconductor Project : पुणे जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या वेदांता-फॉक्सकॉन सेमिकंटक्टर प्रकल्प अचानक गुजरातमध्ये हलवण्यात आल्यानंतर आता राज्यात शिवसेना विरुद्ध सत्ताधारी शिंदे गट असा जोरदार संघर्ष पेटला आहे. हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर आगपाखड केली होती. त्यानंतर आता त्यांना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

माध्यमांशी बोलताना उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानं मविआचे नेते त्याचं खापर शिंदे-फडणवीस सरकारवर फोडत आहेत. परंतु या प्रकल्पांबाबत काय नेमकी प्रक्रिया असते, हे विरोधी पक्षनेते अजित पवारांना माहिती आहे. केवळ परदेशात जाऊन उद्योजकांची भेट घेतल्यानं प्रकल्प राज्यात येत नसतात, त्यासाठी हायपॉवर समितीची स्थापना करावी लागते, आपण उद्योगांना काय देतो आहे, याचा विचार करावा लागतो, असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

दावोसमध्ये गेल्यानंतर आम्ही वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी हा प्रकल्प महाराष्ट्रात आणणार असल्याचं मान्य केलं होतं, असा दावा शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी केला होता. त्यावर बोलताना उदय सामंत यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

गेल्या सात महिन्यात वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारनं काहीच केलेलं नव्हतं. जेव्हा राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं तेव्हा त्यासाठी हायपॉवर कमिटीची स्थापना करण्यात आली होती. शिंदे सरकारनं या उद्योगासाठी ३८ हजार ८३१ कोटींचं पॅकेज मंजुर केलं होतं.

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यासाठी प्रयत्न करत असून वेदांताचे मालक अग्रवाल यांनी ट्विट केल्यानंतर आता त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. कारण आता त्यांनी या प्रकल्पाशी संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात आणणार असल्याचं आश्वासन दिलं आहे, असं उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.

IPL_Entry_Point