Maratha Protest : जरांगेंच्या आंदोलनामुळे मार्केट बंद, मुंबईकरांच्या भाजीपाला पुरवठ्यासाठी सरकारचा मोठा निर्णय-maratha reservation protest government took big decision regarding vegetable cultivation ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maratha Protest : जरांगेंच्या आंदोलनामुळे मार्केट बंद, मुंबईकरांच्या भाजीपाला पुरवठ्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

Maratha Protest : जरांगेंच्या आंदोलनामुळे मार्केट बंद, मुंबईकरांच्या भाजीपाला पुरवठ्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

Jan 26, 2024 10:03 PM IST

Maratha Reservation Agitaion : मराठा मोर्चामुळे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद आहे,त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाबाबत राज्य सरकारने नवा जीआर काढला आहे.

Maratha Protest
Maratha Protest

मराठा आरक्षण आंदोलनाचं वादळ मुंबईच्या वेशीवर येऊन धडकलं आहे. आज मनोज जरांगे आझाद मैदानावर जाणार होते मात्र सरकारने काही जीआर काढून शिष्टमंडळाशी चर्चा केल्याने आंदोलकांनी सरकारला उद्या दुपारी १२ वाजेपर्यंत मुदत दिली असून आंदोलकांचा मुक्काम नवी मुंबईतील वाशी परिसरात एपीएमसी मार्केटमध्ये आहे. यामुळे फळ भाजीपाला मार्केट बंद राहिल्याने शेतकऱ्यांनी माल विकावा कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे, तसेच मुंबईकरांना फळे भाजीपाल्याची टंचाई जाणवू नये, यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

नवी मुंबईमध्ये वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये मनोज जरांगे पाटील थांबले आहेत. मराठा मोर्चामुळे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाबाबत राज्य सरकारने नवा जीआर काढला आहे. 

वाशी एपीएमसीमध्ये मराठा आंदोलन सुरू असल्यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना फटका बसू शकतो, त्यामुळे मुंबई ठाणे पर्यायी मार्गाने तसंच अटल सेतूवरून शेतीमालाच्या नाशवंत वस्तूंच्या गाड्या आणण्याचं आवाहन सरकारने केलं आहे.

आंदोलक नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुक्कामी आहेत. पुढील काही दिवसही हे मार्केट बंद राहण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतमालाची व इतर खाद्य पदार्थाची आवक व पर्यायाने व्यवहार प्रभावित होण्याची शक्यता आहे. परिणामी, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका हद्द व ठाणे महानगरपालिका हद्द व इतर जोडून असणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रातील ग्राहकांना भाजीपाला व इतर दैनंदिन खाद्यपदार्थांचा संभाव्य तुटवडा टाळण्याकरीता परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत उपाय योजना तसेच पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. 

संचालक, पणन, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य, कृषी पणन मंडळ, पुणे व सचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी आपसात समन्वय साधून आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर सर्व संबंधित महानगरपालिका यांच्यासोबत संपर्क करुन ग्राहकांपर्यंत उपरोक्त शेतीमाल पोहण्याबाबतची दक्षता घ्यावी, असे निर्देश सरकारने जारी केले आहेत.

राज्यातील पुणे मार्गे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होणारा शेतमाल थेटपणे पनवेलनंतर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गे बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी व माल वाहतूकदारांनी मुंबई शहारातील दैनंदिन वाहतुकीस बाधा पोहचणार नाही, अशा पद्धतीने तसेच छोट्या मंडईतील किरकोळ व्यापाऱ्यांना / ग्राहकांना विक्री करावा. पुढील काही तास एपीएमसी मार्केट बंदच राहणार असल्याने सरकारने परिपत्रक काढून आदेश दिले आहेत.