Akola crime news: अकोला येथे आज सकाळी एक हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून मुलीसह माहेरी गेलेल्या पत्नीची आणि मुलीची पतीने कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आकोल्यातील हनुमानवस्ती परिसरात आज बुधवारी सकाळी घडली. गेल्या १० दिवसांत दुहेरी हत्याकांडाची घडलेली ही दुसरी घटना आहे.
मनीष म्हात्रे असे आरोपी पतीचे नाव आहे. तर रश्मि म्हात्रे असे खून केलेल्या पत्नीचे नाव आहे. ९ वर्षीय खून केलेल्या मुलीचे नाव समजू शकले नाही. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनिष म्हात्रे व पत्नी रश्मि हे दोघे सोबत राहत होते. मात्र, त्यांच्यात सतत वाद होत असल्याने रश्मी ही टीच्या मुलीसह तिच्या माहेरी नांदेड येथे निघून गेली होती. ती गेल्या पाच वर्षांपासून मुलीसह माहेरी नांदेड येथे राहत होती. मात्र, म्हात्रे कुटुंबातील नातेवाईकांचे लग्न असल्याने रश्मी म्हात्रे या मुलीसह मंगळवारी अकोल्यात आल्या होत्या.
तब्बल पाच वर्षांनंतर घरी आल्याने पती मनीष आणि पत्नी रश्मिमध्ये पुन्हा जोरदार भांडण झाले. हा वाद टोकाला गेल्याने रागाच्या भरात आरोपीने बुधवारी सकाळी पत्नी व मुलीवर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांना याची माहिती मिळताच रामदास पेठ पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तसेच आरोपी पती मनिष म्हात्रे याला अटक करण्यात आली आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी रामदास पेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात खुनाच्या घटना वाढल्या आहेत. यमुळे अकोल्यात कायदा अनाई सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
संबंधित बातम्या