महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेची तिसरी वार्षिक सहकार परिषद कर्जतमध्ये सुरू आहे. नेरळजवळील धामोते येथे असलेल्या डिस्कव्हर रिसोर्टमध्ये ६ आणि ७ जानेवारी दरम्यान ही परिषद होत आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देश, राज्यातील राजकारण, सहकार व भोगोलिक क्षेत्राबाबत परखड भाष्य केले.
सहकार परिषद २०२४' ह्या कार्यक्रमातील भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
• घरात बसून जे म्हणतात कि मराठी माणसाला उद्योगधंदा जमत नाही त्यांना माझं एकंच सांगणं आहे कि, महाराष्ट्रात फिरा... तुम्हाला मराठी माणूस हजारो कोटींचे व्यवसाय यशस्वीपणे चालवताना दिसतील. जगप्रसिद्ध शनेल नावाच्या परफ्युमसाठीचा अर्क हे आपल्या महाराष्ट्रातून एक मराठी माणूस पुरवतो.
• सर्वांनी एकत्र येऊन सहकार सांभाळायचं याचा अर्थ म्हणजे आताचं सरकार नाही, बरं का. आताचं सरकार म्हणजे सहारा चळवळ. आम्ही अडकलोय आम्हाला सहारा द्या.
• महात्मा फुले ह्यांचं सहकार चळवळीतलं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांच्या घशात जाऊ नये म्हणून पहिलं आंदोलन केलं ते आमच्या महात्मा फुलेंनी केलं.
• देशात सर्वाधिक महाराष्ट्रात सव्वादोन लाखापेक्षा जास्त सहकारी संस्था आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतं गुजरात राज्य... ज्या गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा आहे. गुजरातची अमूल डेअरी आपल्या महाराष्ट्राच्या महानंदा डेअरीला गिळायला आवासून उभी आहे.
• साखर कारखाने हवेत म्हणून ज्या मराठवाड्यात पाण्याचं दुर्भिक्ष आहे तिथे सर्वाधिक पाणी लागणारं उसाचं पीक घेतलं जातंय. त्यासाठी जमिनीतून अतोनात पाणी शोषलं जातंय. भूजल पातळी अशीच कमी होत गेली तर पुढच्या ४०-५० वर्षात मराठवाड्याचा वाळवंट होईल आणि ती जमीन पुन्हा पुर्वव्रत करायला १५० वर्ष लागतील असा नॅशनल जिओग्राफिकचा अहवाल आहे.
• महाराष्ट्रात जाती-जातीत जो भेद निर्माण होतोय... हे एक षडयंत्र आहे. महाराष्ट्र एकसंध राहू नये, इथला मराठी माणूस एकत्र राहू नये... ह्यासाठी बाहेरच्या सूत्रधारांचे प्रयत्न सुरु आहेत पण हे आमच्या लोकांना समजत नाहीये. • मी गेली अनेक वर्ष पोटतिडकीने हेच सांगतोय... कि महाराष्ट्राचं जे जे चांगलं आहे ते तिथून बाहेर काढा, महाराष्ट्रापासून वेगळं करा... तसं होत नसेल तर उध्वस्त करा. पण महाराष्ट्राला दुबळं करा.... असं एक कटकारस्थान सुरु आहे.
• कोणताही इतिहास भूगोलाशिवाय पूर्ण होत नाही. जगातील जेवढी युद्ध झाली ती सर्व जमीन बळकावण्यासाठीच झाली आहेत. आपली जमीन हेच आपलं अस्तित्व आहे.
• माझी रायगडमधील मराठी बांधवांना हात जोडून विनंती आहे, शिवडी-न्हावाशेवा पूल पूर्ण होईल, उद्या इथे विमानतळ होईल तेव्हा रायगड जिल्ह्यातील जमिनी राखा, इथलं मराठी माणसाचं अस्तित्व जपा. नाहीतर भविष्यात पश्चातापाचा हात कपाळावर मारण्यापलीकडे काहीही उरणार नाही.
• छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं आपला शत्रू समुद्रमार्गे येईल, समुद्रावर गस्त वाढवा. पण आम्ही बेसावध. महाराष्ट्रात आजपर्यंत झालेल्या सर्व दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी समुद्रमार्गेच आले आहेत. ३५० वर्षांपूर्वी महाराजांनी सांगूनही आमचे राज्यकर्ते त्यातून बोध घेत नाहीत.
• ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी आरमार उभं केलं. त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजरा करायच्या पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या कोकण किनारपट्टीला राखायचं नाही... मग हिंदवी स्वराज्याकडून आपण काय प्रेरणा घेतली?
• आपल्याकडे येणारे प्रकल्प हिसकावले जातात, हजारो एकर जमिनी गिळल्या जात आहेत, मराठी माणसाला आपापसात झुंजवलं जातंय... महाराष्ट्राच्या विरोधात अनेक महाराष्ट्र-द्वेष्ट्यांची मिळून अशीही एक सहकार चळवळ गेली ७० वर्ष सुरु आहे.
• आपले महाराष्ट्राचे नेते मिंधे झालेले आहेत, पैशांसाठी वेडे झाले आहेत... त्यांना महाराष्ट्राचं सत्व कळत नाही. त्यांना पाठीचा मणका नाही. स्वतःची मनं आणि स्वाभिमान त्यांनी गहाण टाकलेला आहे.
• ज्या निष्ठुरपणे देशातील राजकारण सुरु आहे, ज्याप्रकारे न्यायव्यवस्था सुरु आहे. त्यानुसार उद्या ते मुंबईला हात घालायला मागे-पुढे बघणार नाहीत. महाराष्ट्राचे तुकडे करायला, विदर्भ वेगळा करायला वेळ लावणार नाहीत. हे का होतंय? कारण मराठ्यांनी सव्वाशे वर्ष या देशावर राज्य केलंय, महाराष्ट्र स्वतंत्र मताचा प्रदेश आहे. हेच दिल्लीश्वरांना सतत खुपत आलंय.