मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra MLC Election: 'हे' आहेत आजचे किंगमेकर

Maharashtra MLC Election: 'हे' आहेत आजचे किंगमेकर

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 20, 2022 10:59 AM IST

Vidhan Parishad Nivadnuk 2022: राज्यसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाव घेऊन आरोप केलेले बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार व अन्य अपक्ष आमदार आजच्या विधान परिषद निवडणुकीत किंगमेकर ठरणार आहेत.

Vidhan Bhavan
Vidhan Bhavan

Maharashtra Vidhan Parishad Election 2022: राज्य विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. बहुमत असतानाही राज्यसभेची एक जागा गमवावी लागल्यामुळं महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सावध झाले आहेत. आपापल्या आमदारांना सोबत राखण्याची जबाबदारी प्रत्येक पक्षानं घ्यायची अशी रणनीती ठरली आहे. मात्र, खरी मदार ही छोटे पक्ष व अपक्षांवरच असेल. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीसह अपक्ष आमदारच या निवडणुकीत किंगमेकर ठरणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

राज्यसभेच्या निवडणुकीत खुल्या पद्धतीनं मतदान झालं होतं. राजकीय पक्षाच्या आमदारांनी आपापलं मत पक्षाच्या प्रतिनिधींना दाखवणं बंधनकारक होतं. केवळ अपक्षांना यातून सूट होती. त्यामुळं अपक्षांनी आपल्या मर्जीप्रमाणं मतदान केलं. त्यात भाजपच्या अतिरिक्त उमेदवाराला लॉटरी लागली. हितेंद्र ठाकूर यांनीही अखेरपर्यंत भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र, त्यांच्या पक्षाची तिन्ही मतं भाजपच्या पारड्यात पडल्याचं मानलं जातं. 

विधान परिषदेच्या निवडणुकीत मात्र संपूर्ण मतदान गुप्त पद्धतीनं होणार आहे. त्यामुळं पक्षाचे आमदार काय करतील याचाही नेम नाही. मात्र, पक्षाचे आमदार पक्षासोबत राहिले तरी छोटे पक्ष व अपक्षांचं काही सांगता येत नाही. त्यामुळं पुन्हा एकदा त्यांच्या भूमिकेकडं लक्ष लागलं आहे. 

राज्यसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाव घेऊन बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार, अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, संजय (मामा) शिंदे, शामसुंदर शिंदे यांच्यावर घोडेबाजाराचे आरोप केले होते. त्यामुळं ते आमदार संतापले होते. अर्थात, नंतर शिवसेनेच्या नेत्यांनी व आघाडीतील इतर नेत्यांनीही भेटीगाठी घेऊन त्यांची समजूत काढली. त्याचबरोबर प्रत्येक पक्षानं व उमेदवारानं अपक्षांची व हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन त्यांच्याकडं मदतीची विनंती केली आहे. त्यामुळं आता हे आमदार व हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी काय करते, यावर दहावा उमेदवार भाजपचा असेल की महाविकास आघाडीचा हे ठरणार आहे.

IPL_Entry_Point