उदयनराजे भोसले देणार खासदारकीचा राजीनामा; भाजपला एका वाक्यात दिला थेट इशारा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  उदयनराजे भोसले देणार खासदारकीचा राजीनामा; भाजपला एका वाक्यात दिला थेट इशारा

उदयनराजे भोसले देणार खासदारकीचा राजीनामा; भाजपला एका वाक्यात दिला थेट इशारा

Dec 03, 2022 01:41 PM IST

UdayanRaje Bhosale : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

UdayanRaje Bhosale PC Today
UdayanRaje Bhosale PC Today (HT)

UdayanRaje Bhosale PC Today : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यपालांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी उदयनराजेंनी आज रायगडावर शिवभक्तांशी संवाद साधला असून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. त्यामुळं आता राज्यपाल कोश्यारी आणि भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यातच आता भाजपनं जर कोश्यारींना पदमुक्त केलं नाही तर राजीनामा देण्याबाबत उदयनराजेंनी मोठं विधान केलं आहे.

राज्यपाल कोश्यारी आणि भाजपविरोधात आज उदयनराजे भोसले यांनी रायगडावर आत्मक्लेश आंदोलन केलं आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणाबाबत भूमिका स्पष्ट करताना राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. जर भाजपनं राज्यपाल कोश्यारींची हकालपट्टी केली नाही तर वेळप्रसंगी मी बघेल आणि तेही करेल, अशी प्रतिक्रिया देत खासदार उदयनराजे भोसलेंनी भाजपला एका वाक्यात थेट इशारा दिला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांचा निषेध करण्यासाठी उदयनराजे भोसलेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता वेळप्रसंगी मी तेही करणार असल्याचं म्हणत उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपालपदावर राहण्याचा अधिकार नाही. भाजपच्या शीर्ष नेत्यांनी त्यांचा तातडीनं राजीनामा घेण्याची मागणी उदयनराजेंनी केली आहे.

Whats_app_banner