मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amit Shah In Kolhapur : आगामी लोकसभा आणि विधानसभेचं गणित कसं असेल?, अमित शहांनी स्पष्टच सांगितलं!

Amit Shah In Kolhapur : आगामी लोकसभा आणि विधानसभेचं गणित कसं असेल?, अमित शहांनी स्पष्टच सांगितलं!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 19, 2023 10:17 PM IST

Amit Shah In Kolhapur : कोल्हापुरातील सभेत गृहमंत्री अमित शहांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. याशिवाय आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांबाबत शहांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Home Minister Amit Shah Kolhapur Visit
Home Minister Amit Shah Kolhapur Visit (HT_PRINT)

Home Minister Amit Shah Kolhapur Visit : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असतानाच निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला बहाल केलं आहे. त्यावरून ठाकरे आणि शिंदे गटात राजकीय वादंग पेटलेलं असतानाच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तीनदिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. नागपूर आणि पुण्यातील कार्यक्रम आटोपल्यानंतर अमित शहा आज कोल्हापुरात आले होते. यावेळी अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यातून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

कोल्हापुरातील भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, आगामी लोकसभा, विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा एकत्र लढणार आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीसह उरलेसुरलेले सर्व पक्ष आमच्याविरोधात रिंगणात असणार आहेत. परंतु आगामी लोकसभा निवडणूक ही फक्त नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी नाही तर भारताला महान आणि समृद्ध करण्यासाठी महत्त्वाची असणार असल्याचं गृहमंत्री अमित शहा म्हणाले.

ज्या-ज्या वेळी मी कोल्हापुरात येऊन श्री करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं आहे, त्यावेळी भाजपाचा विजय झालेला आहे. त्यामुळं आता आजही मी अंबाबाईचं दर्शन घेतलं असून त्यामुळं आता २०२४ मध्ये भाजपाचा विजय नक्की होणार असल्याचं अमित शहा म्हणालेत. एखाद्या ठिकाणी एकदा का भाजपाचा विजय झाला तर तिथं पुन्हा भाजपच निवडून येते. त्यामुळं मला आगामी निवडणुकांची चिंता नसल्याचंही अमित शहांनी स्पष्ट केलं आहे.

गेल्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजप-शिवसेनेची युती होती, त्यावेळी आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवली. परंतु निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंनी वडिलांच्या विचारसरणीला मूठमाती देत विरोधी पक्षांसोबत घरोबा केला. त्यामुळंच आज खरी शिवसेना आमच्यासोबत आली असल्याचं सांगत आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती कायम राहणार असल्याचं गृहमंत्री अमित शहांनी स्पष्ट केलं आहे.

IPL_Entry_Point