मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut: संजय राऊतांना धक्का, शिवसेनेचं संसदीय नेतेपद गेलं; शिंदे गटाकडून ‘या’ नेत्याची नियुक्ती

Sanjay Raut: संजय राऊतांना धक्का, शिवसेनेचं संसदीय नेतेपद गेलं; शिंदे गटाकडून ‘या’ नेत्याची नियुक्ती

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 23, 2023 05:21 PM IST

Sanjay Raut vs Eknath Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना शिवसेनेच्या संसदीय पक्षनेतेपदावरून हटवण्यात आलं आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut (HT_PRINT)

Shiv Sena Parliamentary Leader : राज्य विधीमंडळाचं अधिवेशन सुरू असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का दिला आहे. निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांची शिवसेनेच्या संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळं आता ठाकरे गट पुन्हा एका नव्या राजकीय अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिंदे गटाच्या कार्यकारिणीची बैठक फेब्रुवारीमध्ये पार पडली होती. त्यात शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांची शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावर निवड करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर आता लोकसभेच्या अध्यक्षांनी या नियुक्तीस मंजुरी देत गजानन किर्तीकर यांच्या नियुक्तीला संमती दिली आहे. त्यामुळं आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी शिंदे गटाकडून शिवसेनेचा लोकसभेतील गटनेता बदलण्यात आला होता. त्यानंतर आता संसदीय नेतेपदी किर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यसभेचे खासदार असलेले संजय राऊत हे शिवसेनेच्या संसदीय नेतेपदी होते. तर लोकसभेतील गटनेत्या भावना गवळी या होत्या. परंतु शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गटाकडून लोकसभेत राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. या निवडीला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संमती दिली होती. त्यानंतर आता शिवसेनेचा संसदीय नेता बदलण्यात आल्यामुळं हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

IPL_Entry_Point