मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mundhwa Suicide Case : एकाच कुटुंबातील चार लोकांची आत्महत्या; धक्कादायक घटनेनं पुण्यात खळबळ

Mundhwa Suicide Case : एकाच कुटुंबातील चार लोकांची आत्महत्या; धक्कादायक घटनेनं पुण्यात खळबळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 13, 2023 11:59 PM IST

Mundhwa Pune Suicide Case : पुण्यात एका कुटुंबातील चार सदस्यांनी औषध पिऊन जीवन संपल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Mundhwa Pune Suicide Case
Mundhwa Pune Suicide Case (HT_PRINT)

Mundhwa Pune Suicide Case : एकाच कुटुंबातील तब्बल चार जणांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली असून मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात ही घटना घडली असून त्यात पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय परिसरात तब्बल चार जणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यामुळं मुंढव्यात स्थानिकांनी मोठ्या संख्येनं घटनास्थळी गर्दी केली आहे.

कुटुंबातील मृत व्यक्तींच्या नावाचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. परंतु शेयर मार्केटमध्ये कुटुंबाचं मोठं आर्थिक नुकसान झाल्यामुळंच चार जणांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कुटुंबातील लोकांनी नेमकी कधी आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी याची माहिती तातडीनं पोलिसांना दिली, त्यानंतर आता पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. चारही व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले जाणार आहे. त्यापूर्वी पोलिसांनी ही आत्महत्या आहे की घातपात आहे, याची चौकशी करायला सुरुवात केली आहे.

काही महिन्यांपूर्वीच सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तब्बल नऊ लोकांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता पुण्यातील मुंढव्यातही अशीच घटना घडल्यामुळं अनेकांना धक्का बसला आहे. घटनास्थळी पोलिसांसह स्थानिकांनी मोठी गर्दी केल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबानं शेयर मार्केटमध्ये लाखो रुपये गुंतवले होते. परंतु त्यात मोठं नुकसान झाल्यामुळं पतीसह पत्नीनं टोकाचं पाऊल उचलल्यामुळं पुण्यात खळबळ उडाली आहे.

IPL_Entry_Point