मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : मेघालयात तुम्ही कॉनराड संगमाचं काय चाटत आहात?, ठाकरेंचा अमित शहांना खोचक टोला

Uddhav Thackeray : मेघालयात तुम्ही कॉनराड संगमाचं काय चाटत आहात?, ठाकरेंचा अमित शहांना खोचक टोला

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 06, 2023 10:49 AM IST

Uddhav Thackeray Speech : आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करतात, पण तुमची वंशावळ काय आहे, तेही सांगा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

Uddhav Thackeray vs Amit Shah
Uddhav Thackeray vs Amit Shah (HT)

Uddhav Thackeray vs Amit Shah : ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीच्या खेडमधील शिवगर्जना सभेतून भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच जाहीर सभेतून सत्ताधारी भाजप-शिंदे गटावर तुफान टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटल्याची टीका केली होती, त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी अमित शहांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळं आता यावरून भाजपा आणि ठाकरे गटात जोरदार राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

खेडमधील शिवगर्जना सभेत बोलताना उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, मेघालयात विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तिथे जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी तेथील मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. आता तेथील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत त्यांचं अभिनंदन केलं. इतकंच नाही तर आपण दोघं मिळून सत्ता स्थापन करू, असंही म्हटलं. निवडणूक आली की भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि लोकांनी निवडणुकीत उताणं केलं सत्तेसाठी गोंडा घोळायचा, आता तुम्ही मेघालयात सत्तेसाठी कॉनराड संगमा यांचं काय चाटता आहात?, असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मी बाळासाहेबांचा पुत्र आहे, हे अभिमानानं सांगतो. ठाकरेंची सहावी पिढी महाराष्ट्रातील जनतेसाठी राबत आहे. परंतु आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करताना तुमचा आगापिच्छा काय आहे किंवा तुमची वंशावळ काय आहे?, तेही आम्हाला सांगा, असाही सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. पुण्यातील कसबा पेठेत चित्र साफ झालं आहे, चिंचवडमध्ये गद्दारी झाली नसती तर तिथेही भाजपचा सुफडा साफ झाला असता. अंधेरीमध्ये निवडणूक लढवायची यांच्यात हिंम्मत नव्हती, त्यामुळं आता आगामी काळात गद्दारांना धडा शिकवावाच लागेल, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टोलेबाजी केली आहे.

IPL_Entry_Point