मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shinde Group : शिंदे गटाला ‘गदा’ हे चिन्ह मिळण्याची दाट शक्यता; निवडणूक आयोग आज घेणार अंतिम निर्णय

Shinde Group : शिंदे गटाला ‘गदा’ हे चिन्ह मिळण्याची दाट शक्यता; निवडणूक आयोग आज घेणार अंतिम निर्णय

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 11, 2022 08:46 AM IST

Shinde Group Symbol : निवडणूक आयोगानं काल ठाकरे गटाला नाव आणि चिन्ह बहाल केलं आहे. शिंदे गटालाही नाव देण्यात आलं असून त्यांना चिन्ह आज मिळणार आहे.

Shinde Group Symbol
Shinde Group Symbol (Deepak Salvi)

Shinde Group Symbol : शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर आता ठाकरे आणि शिंदे गटात नव्या पक्षाच्या चिन्हावरून शर्यत सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला 'शिवसेना- बाळासाहेब ठाकरे', असं नाव आणि मशाल चिन्ह दिलं आहे. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना', असं नाव दिलं आहे. काल निवडणूक आयोगानं चिन्हासाठी पुन्हा नव्यानं अर्ज करण्याचे निर्देश शिंदे गटाला दिले होते. त्यानुसार आज शिंदे गटाकडून आज अर्ज दाखल केला जाणार असून निवडणूक आयोग शिंदे गटाच्या चिन्हावर आजच निर्णय घेणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शिंदे गटाला कोणतं चिन्ह मिळणार?

ठाकरे गटासह शिंदे गटानंही निवडणूक आयोगाकडे त्रिशूळ आणि उगवता सूर्य हे चिन्ह मागितलं होतं. परंतु त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह असल्यानं आणि उगवता सूर्य हे डीएमकेचं निवडणूक चिन्ह असल्यानं आयोगानं दोन्ही गटांना ही चिन्ह देण्यास नकार दिला. त्यानंतर ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळालं आहे. काल शिंदे गटानं गदा या चिन्हाला तिसऱ्या पसंतीचं चिन्ह दिलं होतं. त्यामुळं आज निवडणूक आयोग गदा हे चिन्ह शिंदे गटाला देण्याची शक्यता आहे.

आम्हीच बाळासाहेबांचे वारसदार- शिंदे

काल निवडणूक आयोगानं शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव दिलं. या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंसोबतचा एक फोटो शेयर केला. त्याला त्यांनी 'वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत', असं कॅप्शन दिलं. त्यामुळं आता शिंदेंनी बाळासाहेबांवर केलेल्या दाव्यामुळंही शिंदे गट आणि ठाकरेंच्या मूळ शिवसेनेत वादंग पेटण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point