मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ED and IT Raid : हसन मुश्रीफांच्या घरावर ईडीचे छापे; कोल्हापुरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

ED and IT Raid : हसन मुश्रीफांच्या घरावर ईडीचे छापे; कोल्हापुरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 11, 2023 10:09 AM IST

ED and IT Raid In Kolhapur : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज सकाळी ईडी आणि आयटी विभागानं एकत्रित छापेमारी केल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे.

ED and IT Raid On Hasan Mushrifs Home
ED and IT Raid On Hasan Mushrifs Home (HT)

ED and IT Raid On Hasan Mushrifs Home : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सकाळी साडेसहा वाजेपासून ईडी आणि आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापा मारला असून त्यांच्या संपत्तीच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या राजकीय नेत्याच्या घरी छापेमारी झाल्याची घटना समोर आल्यामुळं राज्यात खळबळ उडाली असून या कारवाईच्या विरोधात कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडी आणि आयकर विभागाचे तब्बल २० अधिकारी सकाळी साडेसहाच्या सुमारास राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी आले. त्यानंतर पोलिसांकडून मुश्रीफांच्या घराची सुरक्षा वाढवून अधिकाऱ्यांनी मुश्रीफांच्या संपत्तीची चौकशी सुरू केली आहे. कोणत्याही बाहेरील व्यक्तीस आत येण्यास आणि बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफांवर १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. याशिवाय संताजी घोरपडे कारखान्यात मुश्रीफांच्या संचालक मंडळानं गैरव्यवहार केल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आला होता. त्यानंतर हसन मुश्रीफ हे तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.

हसन मुश्रीफ यांच्या घरावर तपास यंत्रणांनी छापेमारी केल्याची माहिती समजताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर आणि कागलमध्ये आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप आणि ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुश्रीफांवर आरोप केल्यानंतर काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतर आता त्यांच्या घरावर छापेमारी करण्यात आल्यामुळं राज्यात राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point