मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sai Resort Dapoli : अनिल परब यांचं साई रिसॉर्ट जमीनदोस्त होणार; बांधकाम विभागाची वृत्तपत्रात जाहिरात

Sai Resort Dapoli : अनिल परब यांचं साई रिसॉर्ट जमीनदोस्त होणार; बांधकाम विभागाची वृत्तपत्रात जाहिरात

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 22, 2022 01:49 PM IST

Anil Parab Sai Resort In Dapoli : शिवसेनेचे नेते व माजी मंत्री अनिल परब यांचं रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्यासाठी बांधकाम विभागानं वर्तमानपत्रात जाहिरात दिली आहे

Anil Parab Sai Resort In Dapoli
Anil Parab Sai Resort In Dapoli (HT)

Anil Parab Sai Resort In Dapoli : शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते आणि राज्याचे माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना शिंदे-फडणवीस सरकारनं मोठा झटका दिला आहे. कारण आता परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्यासाठी बांधकाम विभागानं स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात दिली आहे. जाहिरातीनुसार येत्या तीन महिन्यांच्या काळात साई रिसॉर्ट जमीनदोस्त होणार असल्यानं अनिल परबांच्या अडचणी वाढल्या आहेत. याशिवाय वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत अनिल परबांवर निशाणा साधला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत माजी मंत्री अनिल परब यांचं साई रिसॉर्ट आहे. हे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचा आणि अनधिकृत जागेवर बांधल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी अनेकदा केलेला आहे. याशिवाय त्यांनी साई रिसॉर्ट पाडण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. परंतु आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर चिपळूणच्या बांधकाम विभागानं रत्नागिरीतील स्थानिक वृत्तपत्र असलेल्या दैनिक तरुण भारतमध्ये साई रिसॉर्ट पाडण्यासाठी जाहिरात दिली आहे.

बांधकाम विभागानं दिलेल्या जाहिरातीनुसार, येत्या १० नोव्हेंबरपर्यंत कंत्राटदारांना टेंडर भरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यात रिसॉर्टचं बांधकाम, कंपाऊडसह इमारतीच्या भिंती संपूर्णत: पाडल्या जाणार आहेत. याशिवाय रिसॉर्ट पाडल्यानंतर उरलेल्या सिमेंट व मातीचा ढिगाऱ्याचीही विल्हेवाट लावण्याच्या कामाचं स्वरुप टेंडरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या कामाची रक्कम ४३ लाख २९ हजार आठ रुपये इतकी ठरवण्यात आली असून त्यासाठी ४३ हजार ३०० रुपये इतकी अनामत रक्कम ठरवण्यात आली आहे. त्यामुळं आता बांधकाम विभागानं प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनंतर हे कंत्राट कोण घेणार आणि साई रिसॉर्ट कधीपर्यंत पाडलं जाणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटर अकाऊंटवर जाहिरातीचे फोटो पोस्ट करत अनिल परबांच्या रिसॉर्ट पाडण्याचं काम नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होऊ शकतं, असं म्हटलं आहे. त्यामुळं आता शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष वाढण्याची चिन्ह आहेत.

IPL_Entry_Point