मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर मुख्यमंत्र्यांची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाले...

Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर मुख्यमंत्र्यांची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 06, 2022 08:28 AM IST

CM Eknath Shinde In Delhi : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील सोलापूर, जत आणि अक्कलकोट शहरांवर दावा ठोकल्यानं राजकीय वादंग पेटलं होतं.

Eknath Shinde On Maharashtra-Karnataka Border Dispute
Eknath Shinde On Maharashtra-Karnataka Border Dispute (PTI)

Eknath Shinde On Maharashtra-Karnataka Border Dispute : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील तीन शहरांवर दावा ठोकल्यानं सीमावादावरून राजकीय वादंग पेटलं होतं. याशिवाय सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केल्यामुळंही कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेनं सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटावर सडकून टीका केली होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पीएम मोदी यांच्यासोबत एका बैठकीला हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावादावर रोखठोकपणे भाष्य केलं आहे.

दिल्लीत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याबाबत कर्नाटक सरकारनं सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी होती. परंतु कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा दौरा रद्द करण्यात आला आहे. मात्र, येत्या काही दिवसांत राज्यातील काही मंत्री सीमाभागातील मराठी भाषिकांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सीमावादाच्या मुद्द्यावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी बोलणं टाळलं आहे. बेळगावच काय देशाच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी कुणी कुणाला अडवू शकत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे.

बेळगावसाठी मी तुरुंगात गेलो- मुख्यमंत्री

महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमावादाच्या लढाईवरून अनेक लोक मतप्रदर्शन करत आहेत. परंतु बेळगाव आणि मराठी भाषिकांसाठी आक्रमकपणा कसा असतो, हे आम्हाला कुणी शिकवण्याची गरज नाही. बेळगावच्या प्रश्नासाठी मी ४० दिवस तुरुंगात होतो. ठाकरे सरकारच्या काळात बेळगावच्या जनतेचं अनुदान बंद करण्यात आलं होतं. परंतु आता आमच्या सरकारनं सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी दोन हजार कोटी रुपये खर्च करून म्हैसाळ पाटबंधारे योजनेचं विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

IPL_Entry_Point