मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Marathi News 06 December 2022 Live

Live Blog

Marathi News 06 December 2022 Live : देवेंद्र फडणवीसांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दूरध्वनी करून बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनांबद्दल तीव्र शब्दांत नाराजी नोंदविली आहे.

Tue, 06 Dec 202209:57 AM IST

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचा बसवराज बोम्मई यांना फोन, महाराष्ट्राच्या वाहनांवरील हल्ल्याबाबत व्यक्त केली नाराजी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दूरध्वनी करून बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनांबद्दल तीव्र शब्दांत नाराजी नोंदविली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं सांगितलं. महाराष्ट्रातून येणार्‍या वाहनांना संरक्षण दिलं जाईल, असंही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आश्वस्त केलं आहे.

Tue, 06 Dec 202208:03 AM IST

SBI Personal Loan: वैयक्तिक कर्ज वितरणात स्टेट बँकेनं ओलांडला ५ लाख कोटींचा टप्पा

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने ३० नोव्हेंबर २०२२ रोजी ५ ट्रिलियन वैयक्तिक बँकिंग कर्जाचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे. वैयक्तिक कर्जांत प्रामुख्याने वैयक्तिक कर्ज, पेन्शन कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, पी- गोल्ड कर्ज आणि इतर वैयक्तिक कर्जांचा समावेश होतो. 'गेल्या काही वर्षांत हाती घेण्यात आलेल्या धोरणात्मक आणि डिजिटल उपक्रमांमुळं वैयक्तिक बँकिंग कर्ज विभागानं (गृह विभाग वगळून) ५ ट्रिलियनचा टप्पा पार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे, अशी माहिती एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी दिली.

Tue, 06 Dec 202207:12 AM IST

Mohandas Sukhtankar: ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचं निधन

ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक नाटक व चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.

Tue, 06 Dec 202207:08 AM IST

Share Market: शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स ३०० हून अधिक अंकांनी गडगडला

शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळत असून सेन्सेक्स ३०० हून अधिक अंकांनी गडगडला आहे. निफ्टी देखील जवळपास १०० अंकांनी घसरून ट्रेड करत आहे.

Tue, 06 Dec 202205:01 AM IST

Mahaparinirvan Diwas : चैत्यभूमी येथे महामानवास राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

दादर येथील चैत्यभूमी येथे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या ६६व्या महापरिनिर्वाणदिनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामानवास विनम्र अभिवादन केले.

Mahaparinirvan Diwas
Mahaparinirvan Diwas

Tue, 06 Dec 202204:53 AM IST

Mahaparinirvan Din: महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी करा दिवसाची सुरुवात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीमध्ये त्यांचं महापरिनिर्वाण झालं होते. त्यांच्या विचारांचा जागर हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. म्हणूनच आम्ही आज तुमच्या सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे काही विचार शेअर करत आहोत. हे विचार तुम्ही कुटुंबीयांना, प्रियजनांना, मित्रांना पाठवू शकता.

१) शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!!

२) बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.

३) माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे.

Tue, 06 Dec 202203:58 AM IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय नामांकित संस्थांशी करार

पुणे:  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची घौडदौड कायम आहे. मागील तीन वर्षात विद्यापीठाने १५० हून अधिक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय नामांकित संस्थांसोबात सामंजस्य करार केले आहे. याचा लेखाजोखा नुकत्याच झालेल्या कुलगुरूंच्या संयुक्त बैठकीत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी मांडला. नवीन शैक्षणिक धोरणात अकॅडमीक क्रेडिट बँक, द्विलक्षी अभ्यासक्रम, क्रेडिट बेस चॉईस सिस्टीम, संशोधन आदींबाबत मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. रोजगारभिमुख शिक्षण, उद्योगांशी समन्वय, संशोधन आणि संशोधनातून तंत्रज्ञान विकास यासाठी हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांशी विद्यापीठाने करार केले आहेत.

Tue, 06 Dec 202203:13 AM IST

एल अँड टी कन्स्ट्रक्शनला बुलेट ट्रेन प्रकल्पातील आणखी एक कंत्राट

एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या बिल्डींग्ज आणि फॅक्टरी व्यवसाय विभागाने नॅशनल हाय- स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एनएचएसआरसीएल) गुजरात येथे मुंबई- अहमदाबाद हाय स्पीड रेलसाठी (एमएएचएसआर) साबरमती डेपो (एमएएचएसआर – डी-२) बांधण्याचे कंत्राट मिळवले आहे. जपानच्या सॉजित्झ कॉर्पोरेशनच्या नेतृत्वाखालील गटाच्या माध्यमातून हे कंत्राट कंपनीला देण्यात आले. एमएएचएसआर – डी-२ पॅकेजअंतर्गत कंपनीने ८२ एकर जागेत वसलेल्या डेपोसाठी डिझाइन, पुरवठा, बांधकाम आणि चाचणी व निर्मिती करणे अपेक्षित असून त्यामध्ये शिनकान्सेन तंत्रज्ञानावर आधारित रोलिंग स्टॉकची पाहाणी व देखभालीसाठी खास उपकरणांचा समावेश असेल. पूर्णत्वानंतर या कामासाठीचा हा भारतातील सर्वात मोठा डेपो असेल.

एल अँड टी आधीपासूनच मुंबई- अहमदाबाद हाय- स्पीड रेल (एमएएचएसआर) प्रकल्पासाठी सिव्हिल व्हायाडक्ट आणि स्टेशन पॅकेजेस सी४, सी५ आणि सी६, स्पेसल स्टील ब्रिजेस पॅकेजेस पी४ (एक्स) आणि पी४ (वाय) आणि बॉलास्टलेस ट्रॅकवर्क्सचे (पॅकेज नं – टी३) काम करत आहे.

Tue, 06 Dec 202202:28 AM IST

पुण्यात मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी परिषदेचे आयोजन

मानसिक स्वास्थ्य चांगले असेल तर आपोआपच आपले जीवन समृद्ध राहते हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून दिनांक ९ ते ११ डिसेंबर या कालावधीत पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच, जेडब्ल्यु मेरियट, पंडित फार्म्स, डी.पी रोड येथे योग, तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्यासाठी संगीताचे महत्त्व, इत्यादी विषयातील तज्ञांचे मार्गदर्शनाखाली परिषद आयोजित करण्यात आली आहे.

सर्वांसाठी खुल्या असलेल्या या परिषदेस ख्यातनाम विचारवंत डॉक्टर कुमार विश्वास डॉक्टर हंसाजी योगेंद्र, शशी सर्वेश, डॉक्टर राजेंद्र बर्वे, योगतज्ञ श्री एम, गौरांग दास ख्यातनाम अभिनेत्री व तंदुरुस्ती आयकॉन शिल्पा शेट्टी, संगीत क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्ती उस्ताद रशीद खान, मार्शल आर्ट्स तज्ञ चित्ता यज्ञेश शेट्टी तसेच साऊंड हिलिंग क्षेत्रातील तज्ञ प्रियांका पटेल, आहार तज्ञ नुपूर पाटील इत्यादींचे मार्गदर्शन मिळणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने दिनांक ११ डिसेंबर रोजी सिने अभिनेता रितेश देशमुख व त्याची पत्नी तसेच अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांचा 'वेड' हा चित्रपटही दाखविला जाणार आहे. या परिषदेच्या निमंत्रित प्रवेशिका पंडित फार्मस् येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

Tue, 06 Dec 202202:16 AM IST

ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा पुन्हा होणार पूर्ववत करा ; पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील  

पुणे ; ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची बससेवाबससेवा पुन्हा पूर्ववत करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना दिल्या असून, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.  कोरोना काळानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना पीएमपीएमएल प्रशासनाने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ‌अनेक मार्गांवर आपली बससेवा सुरू केली होती. मात्र जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवादेखील सुरू झाली. त्यामुळे महामंडळाने पीएमपीएमएल प्रशासनाकडे पत्र लिहून सदर मार्गांवरील बससेवा बंद करण्याची विनंती केली होती.

Tue, 06 Dec 202202:15 AM IST

गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम राबवावा; आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सूचना

 पुणे : गोवर संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम महानगरपालिका तसेच नगर पालिका क्षेत्रात राबविण्याच्या सूचना राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी   दिल्या. त्याचबरोबर दहा कलमी कार्यक्रम राबविण्‍यात यावा, असेही त्यांनी सांगितले. पुणे येथे टास्क फोर्सची  पहिली बैठक झाली. या बैठकीपूर्वी डॉ. सावंत यांनी टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके आणि आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, राज्य लसीकरण अधिकारी डाॅ. सचिन देसाई यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

Tue, 06 Dec 202202:13 AM IST

Babri Masjid Demolition: बाबरी मशीद विध्वंसाला ३०  वर्षे पूर्ण

देशाला हादरवून सोडणाऱ्या, राजकारणाची दिशा बदलवणाऱ्या बाबरी मशिदीच्या विध्वंस  प्रकरणाला आज ३०  वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी म्हणजे ६  डिसेंबर१९९२ रोजी कारसेवकांनी बाबरी मशिदीचा विध्वंस केला होता. या घटनेमुळे नंतरच्या काळात देशभर दंगली उसळल्या आणि देशाची शांती-सुव्यवस्था बिघडली.  

Babri Masjid Demolition: बाबरी मशीद विध्वंसाला ३०  वर्षे पूर्ण
Babri Masjid Demolition: बाबरी मशीद विध्वंसाला ३० वर्षे पूर्ण

Tue, 06 Dec 202202:09 AM IST

चैत्यभूमीवर भूमीवर उसळला जनसागर; महामानवाला आदरांजली

Mahaparinirvan Diwas : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीमध्ये महापरिनिर्वाण झाले. आज मुंबई येथे महामानवाला आदरांजली वाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक चैत्यभूमी येथे जमले आहे. दिवसभर विवध कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत.