मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chandrashekhar Bawankule: महाराष्ट्र भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाबद्दल जाणून घ्या 'या' गोष्टी

Chandrashekhar Bawankule: महाराष्ट्र भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाबद्दल जाणून घ्या 'या' गोष्टी

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 12, 2022 05:47 PM IST

chandrashekhar bawankule: महाराष्ट्रात भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

chandrashekhar bawankule: भाजपने महाराष्ट्रातील कार्यकारिणीत काही बदल केले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ही नियुक्ती केली आहे. याआधी चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूरचे भाजप नेते आहेत. बावनकुळे यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय मानलं जातं.

ट्रेंडिंग न्यूज

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी विधान परिषदेतील सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केलं आहे. तर आशिष शेलार यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे." चंद्रकांत पाटील हे कॅबिनेट मंत्री झाल्याने प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे यांची नियुक्त करण्यात आली आहे. भाजपकडून याबाबत संध्याकाळी अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व, तसंच देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. भाजप महाराष्ट्रातला नंबर वन पक्ष आहे, तो आणखी पुढे कसा नेता येईल, शेवटच्या व्यक्तीपर्यंत कसा पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न करेन."

भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल संक्षिप्त माहिती.

‘छत्रपती सेने’द्वारे राजकीय कारकिर्दीची सुरूवात

चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपमध्ये येण्यापूर्वी छत्रपती सेनेचे अध्यक्ष होते. बावनकुळे यांचा जन्म १३ जानेवारी १९६९ रोजी नागपूर जवळ कामठी तालुक्यातील खसाळा येथे झाला. आपल्या सामाजिक कार्याची सुरूवात त्यांनी कोराडी वीज प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी संघर्ष केला होता.

नितीन गडकरी समर्थक म्हणून ओळख  

गोपीनाथ मुंडे हे विरोधी पक्षनेते असताना नितीन गडकरी यांना पाठिंबा देत १९९५ साली बावनकुळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्षपद देण्यात आले होते. 

विदर्भात भाजपचा ओबीसी चेहरा

विदर्भात ओबीसींची संख्या मोठी आहे. शिवाय आगामी काळात विविध स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे पक्षाचा विस्तार करण्याच्या हेतुने विदर्भातील ओबीसी नेत्याला राज्यस्तरावर मोठं पद देणे भाजपला आवश्यक वाटल्याचे बोलले जाते. त्या दृष्टिने बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्ष पदावरील नियुक्ती महत्वाची मानली जात आहे. 

नागपूर जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सक्रिय राजकारणाला सुरूवात केली. १९९७ आणि २००२ साली ते नागपूर जिल्ह्यातील कोराडी क्षेत्रातून ते जिल्हा परिषद निवडणूक जिंकले. चंद्रशेखर बावनकुळे हे काही काळ भाजपचे नागपूर जिल्हाध्यक्ष होते. याकाळात नागपूर ग्रामीण मध्ये भाजपच्या विस्तारात प्रमुख भूमिका वठवली होती.

सलग तीन वेळा कामठीचे आमदार

नागपूर जिल्हा परिषदेनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट विधानसभा निवडणूक लढवली. नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघातून ते २००४, २००९ आणि २०१४ असे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. २०१४ साली राज्यात सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांना ऊर्जा मंत्रीपद हे महत्वाचे पद देण्यात आले होते. शिवाय पाच वर्ष ते नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते.

२०१९ साली भाजपने विधानसभेचे तिकीट नाकारले तेव्हा…

२०१४-२०१९ दरम्यान तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात बावनकुळे यांनी महत्वाचे खाते सांभाळलेले असताना देखील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना विधानसभेचे तिकीट नाकारले होते. तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. बावनकुठे नाराज असल्याची तेव्हा जोरदार चर्चा होती.

विधानपरिषदेच्या माध्यमातून विधिमंडळात पुन्हा प्रवेश

२०१९ साली विधानसभेचे तिकीट कापल्यानंतर नाराज असलेले बावनकुळे सातत्याने पक्षाच्या विविध कार्यक्रमात सक्रीय राहिले. भाजपने त्यांना प्रदेश सरचीटणीस म्हणून जबाबदारी दिली. त्यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, वाढीव वील बिल विरोधी आंदोलन अशा विविध आंदोलनात सहभाग घेऊन नेतृ्व केले. यशस्वी नेतृत्व केलं. परिणामी नोव्हेंबर २०२१ मध्ये नागपूर स्थानिक स्वराज संस्थामधून बावनकुळे यांना भाजपने विधान परिषदेसाठी संधी दिली. आणि ते परत आमदार झाले होते.

 

IPL_Entry_Point