मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar : ‘त्यामुळेच महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणजे शरद पवार; अशी माणसं..’, नितीन गडकरींची स्तुतीसुमने

Sharad Pawar : ‘त्यामुळेच महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणजे शरद पवार; अशी माणसं..’, नितीन गडकरींची स्तुतीसुमने

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 27, 2023 06:28 PM IST

Nitin Gadkari On Sharad Pawar : कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या व गुणवत्ताधारकांच्या पाठिशी उभं राहणारे महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणजे शरद पवार असल्याचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari on sharad pawar
Nitin Gadkari on sharad pawar

Nitin Gadkari On Sharad Pawar – डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावाचा शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने देण्यात येणारा पुरस्कार आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर पंजाबराव देशमुख यांच्या १२५ च्या जंयतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ केंद्र सरकारने जारी केलेल्या १२५ रुपयांच्या नाण्याचे लोकर्पणही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. शरद पवारांना पुरस्कार प्रदान केल्यानंतर गडकरींनी त्यांच्या राजकीय, सामाजिक व कृषी क्षेत्रात केलेल्या कामाचे तोंडभरून कौतुक केले.

ट्रेंडिंग न्यूज

नितीन गडकरी म्हणाले की, पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्रात मोलाचं कार्य केलं आहे. त्यांचे या क्षेत्रात मोठे नाव आहे. शरद पवार यांचेही मोठे नाव आहे. पंजाबरावांची शेतीबाबतची तळमळ, व्हिजन ही शरद पवार यांच्याकडेही आहेत. डॉ. पंजाबराव देशमुखांच्या नावाने शरद पवार यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामुळे आता पुरस्काराने आणखी मोठी उंची गाठली आहे. पण, शरद पवार यांच्या उंचीची माणसं दरवर्षी कुठं मिळणार. कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या व गुणवत्ताधारकांच्या पाठिशी उभं राहणारे महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणजे शरद पवार असल्याचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले. राजकीय धुळवडीत डॉ. पंजाबराव देशमुख, शरद पवार यांच्या सारख्या नेत्यांचे नाव, कार्य सामान्यांच्या कायम लक्षात राहते. शरद पवारांनी ज्या क्षेत्रात संधी मिळेल तेथे कामाचा ठसा उमटला. अनेक आमदार होतात, मंत्री होतात मात्र कालांतराने ते कोणाच्या लक्षातही रहात नाहीत, मात्र पंजाबराव देशमुख व शरद पवारांसारखी माणसं आपल्या कार्याने सदैव लोकांच्या आठवणीत राहतात. 

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यात जितकं दूध उत्पादन होतं. ते संपूर्ण विदर्भातही होत नाही. तेथील ऊस पिकांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. याचे श्रेय शदर पवारांना जाते. माझ्या विनंतीमुळे शरद पवार वसंत शुगरची शाखा विदर्भात काढत आहेत. यासाठी जागाही निश्चित केली आहे.

गडकरी म्हणाले की, राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण असा अर्थ काढला जातो. मात्र ते चुकीचे आहे. आता राजकारण्याच्या व्याख्येत बदल करण्याची गरज आहे. राजकारण म्हणजे राष्ट्रकारण, समाजकारण, विकासकारण, धर्मनीती आहे. राजकारण हेच समाजकारण आहे, असे समजून कृषी क्षेत्रासाठी, शिक्षण, सांस्कृतिक, कला, क्रीडा या सगळ्या क्षेत्रांसाठी आणि त्यातील गुणवत्ताधारकांच्या पाठिशी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पाठिशी उभं राहणारे महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणजे शरद पवार आहेत, अशी स्तुतीसुमने गडकरी यांनी उधळली.

IPL_Entry_Point